अमळनेर | लोक न्यूज
अमळनेर शहरातील पिंपळे रोड परिसरात घडलेल्या एका थरारक घटनेत प्रसंगावधान आणि धाडसाचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळाले. प्रविण रामलाल जैन यांचे चिरंजीव महावीर जैन हे पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे सुमारे १५ ते २० फूट खोल नाल्यात वाहून जात असताना मारवड येथील हर्षल पाटील आणि धुपी येथील प्रशांत पाटील यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यात उडी घेत त्यांना सुखरूप बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, नाल्यात पडल्यामुळे महावीर जैन हे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले होते. ही घटना लक्षात येताच हर्षल पाटील आणि प्रशांत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता धाडसी निर्णय घेत वाहत्या पाण्यात प्रवेश केला. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी महावीर जैन यांना नाल्यातून बाहेर काढले.
घटनेनंतर महावीर जैन यांची तब्येत अत्यंत गंभीर होती. त्यांची सुमारे दोन ते तीन मिनिटे श्वसन प्रक्रिया बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तत्काळ करण्यात आलेल्या मदतीमुळे आणि पुढील वैद्यकीय उपचारांमुळे त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले.
या धाडसी बचावकार्यात हर्षल पाटील आणि प्रशांत पाटील यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान, धैर्य आणि माणुसकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या साहसी कार्यामुळे एका युवकाला नवजीवन मिळाले असून परिसरातील नागरिकांनी दोन्ही युवकांचा गौरव करण्याची मागणी केली आहे.