अमळनेर | लोक न्यूज
गांधलीपुरा परिसरात नागरिकांना धमकावणे आणि दहशत निर्माण केल्याच्या तक्रारींनंतर अमळनेर पोलिसांनी शुक्रवारी सराईत गुन्हेगार राजेश एकनाथ निकुंभ (उर्फ दादू धोबी) याच्यावर कारवाई केली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन गांधलीपुरा पोलीस चौकीत आणले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश निकुंभ याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह (कलम ३०७) विविध गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामिनावर असताना परिसरातील नागरिकांना चाकूचा धाक दाखवणे, धमकावणे, मारहाण करणे आणि लूटमारीचे प्रकार करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकीत आणून त्याची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान त्याच्याकडे कोणतेही हत्यार आढळून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला कायद्याचे पालन करण्याचा कडक इशारा देत समज दिली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचला आहे.