अमळनेर/ लोक न्यूज
अमळनेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून उभी पिके धोक्यात आली असून अनेक ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे.
अतिवृष्टी होऊन दोन दिवस उलटूनही अद्याप महसूल किंवा कृषी विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतांवर पाहणीसाठी पोहोचले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने कोणत्याही अटी-शर्तींची वाट न पाहता तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी सामूहिक मागणी अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून नुकसानभरपाई तातडीने वितरित करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.