लोक न्यूज
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत आमदार अनिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली. विकासनिधी, रेती उत्खनन, राजकीय दबाव, खोटे गुन्हे आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
चौधरी म्हणाले की, कोणताही शासकीय निधी हा शासनाच्या कार्यालयातूनच मंजूर होतो. गावित साहेब आजारी असताना आपण मंत्रालयात जाऊन पाठपुरावा केला होता, मात्र त्यावेळीही विरोधकांनी आपल्या कामाला विरोध केला, असा दावा त्यांनी केला.
आमदार अनिल पाटील यांच्यावर टीका करत चौधरी म्हणाले, "तुम्ही चाटूगिरीचे धंदे बंद करा. ज्या निधीबाबत दावे केले जात आहेत, असा कोणताही निधी आलेला नाही."
काही दिवसांपूर्वी विजय चौधरी आणि एका पोलीस अधिकाऱ्याच्या संभाषणाचा उल्लेख करत त्यांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला, तसेच श्रावण दत्त आणि हेमंत दत्त यांच्या नावांचाही संदर्भ दिला. "माझ्यावर राजकीय दबाव आणून एका विशिष्ट पक्षात जाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाला. माझ्या घरावर हल्ला करण्यात आला आणि उलट माझ्याविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबारमध्ये मला धमकावून राजकीय दबाव टाकण्याचे स्थानिक राजकारण सुरू आहे," असा आरोप त्यांनी केला.
रेती उत्खननाच्या मुद्द्यावर बोलताना चौधरी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात लाखो टन रेती खदानीत टाकून त्यावर कचरा टाकण्यात आला. संबंधित जागेला खाणपट्टा म्हणून मंजुरी आहे का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा साधताना चौधरी म्हणाले, "ज्यांनी आधी डांबर चोरी केले, नंतर रेती चोरी केली, त्यांनी इतरांवर आरोप करू नयेत."
काल घडलेल्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, शासकीय कर्मचारी उपस्थित असतानाही सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. "पोलीस प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहे?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जातीय राजकारणाचा आरोप करत चौधरी म्हणाले की, निवडून आल्यानंतर अनिल पाटील यांनी जातींचे राजकारण केले. मराठा समाजातील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर सिंधी समाजातील तीन मुलांचा जीव गेलेल्या खदानीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. "ती खदान नेमकी कोणी खोदली?" असा सवाल त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणी आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्कात असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
शेवटी त्यांनी गंभीर आरोप करत, "अनिल पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे," अशी मागणी केली.