लोक न्यूज
विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमळनेरचे नगरसेवक प्रवीण गंगाराम पाटील उर्फ राजुदादा फाफोरेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना (ठाकरे गट) चे शरद तायडे यांच्यासह एकूण १४ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी प्रवीण पाटील उर्फ राजुदादा फाफोरेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार आणि महायुतीचा धर्म जपत त्यांनी ही माघार घेतल्याचे " दै.शौर्य मराठी "शी बोलताना सांगितले.
राजकीय वर्तुळात फाफोरेकर यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली होती. मात्र, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी पक्षनिष्ठा आणि युतीधर्माला प्राधान्य देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या या निर्णयाचे महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.