जळगाव:- लोक न्यूज दि. २३ जानेवारी २०२६:
प्रेम, सेवा आणि एकत्वाच्या पावन भावनांनी ओतप्रोत असलेला महाराष्ट्रातील ५९वा निरंकारी संत समागम येत्या २४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत सांगली येथे परमपूज्य सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तसेच निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य सान्निध्यात श्रद्धा व भव्यतेने संपन्न होणार आहे. या तीन दिवसीय सत्संग समारंभासाठी खान्देश मधुन जळगाव, धुळे,नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने भाविक ,श्रद्धाळू व निरंकारी सेवादार रवाना झाले आहेत.
या साठी श्री. हिरालाल पाटील जी, (क्षेत्रीय प्रभारी धुळे झोन ३६-बी) यांच्या व समस्त साध संगतच्या प्रेरणेने माननीय खासदार रक्षा खडसे ताईसाहेब (केंद्रीय राज्यमंत्री) यांच्या अथक प्रयत्नाने विषेश रेल्वे गाडी दि. २३ जानेवारी सोडण्यात आली.
भुसावळ रेल्वे स्टेशनवर नामदार मंत्री संजय जी सावकारे यांच्या सौभाग्यवती रजणी ताई सावकारे, श्री. पुनित अग्रवाल DRM साहेब , भालेराव साहेब स्टेशन ईंचार्ज, भुसावळ शाखेचे मुखी सुरेश जी , संचालक रतन परदेशी जी, आबा पाटील यांनी गाडीस हिरवी झेंडी दिली.
त्याचप्रमाणे जळगाव रेल्वे स्टेशन वरुन खासदार स्मिता ताई वाघ, आमदार राजु मामा भोळे, राजकुमार वाणी जी ब्रम्हज्ञान प्रचारक, रमेश कुमार आहुजा जी संयोजक, व जळगाव महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक इ. यांनी भक्तांशी चर्चा करून आदर व्यक्त केला राजकुमार वाणी यांनी संत निरंकारी मंडलाच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याची माहिती दिली.
या विषेश रेल्वे गाडी चा लाभ जवळपास 2000 भाविकांनी लाभ घेतला. तसेच पाचोरा, चाळीसगाव रेल्वे स्टेशन वर लोको पायलट यांचा सत्कार केला.
हा दिव्य संत समागम सांगली शहरालगतच्या सांगलवाडी परिसरात सुमारे ४०० एकरांच्या विस्तीर्ण व भव्य मैदानावर आयोजित करण्यात येत आहे. या आध्यात्मिक सोहळ्यांतर्गत दररोज दुपारी २.३० वाजता मुख्य सत्संग कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. देश-विदेशातून उपस्थित राहणारे संत, वक्ते, गीतकार व कवी आपल्या विचारांद्वारे, गीतांद्वारे व रचनांद्वारे ईश्वर-परमात्मा आणि सद्गुरूंप्रती श्रद्धाभाव व्यक्त करतील. प्रत्येक दिवसाचा समारोप रात्री ९ वाजता सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराजांच्या प्रेरणादायी आशीर्वचनांनी होणार असून, ती सर्व भाविकांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शनाचा आधार ठरेल.
यंदाच्या महाराष्ट्र प्रादेशिक संत समागमासाठी ‘आत्म-मंथन’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. आत्मबोध, आत्मशुद्धी आणि मानवी मूल्यांच्या जागृतीच्या दिशेने ही संकल्पना संपूर्ण संत समागमाला गहन व अर्थपूर्ण आध्यात्मिक प्रवाह प्रदान करीत आहे.
या संत समागमासाठी येणार्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी निवासी तंबू, भव्य लंगर व्यवस्था (सामूहिक भोजन), कॅन्टीन, औषधालय, सुरक्षा यंत्रणा, नियोजित वाहनतळ तसेच रेल्वे स्थानक व बस स्थानकांहून ये-जा करण्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. समागम परिसरात स्वच्छता व सुव्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.