लोक न्यूज
लोकशाही मूल्ये, भारतीय संविधान आणि राष्ट्रप्रेमाचा गौरव करणारा ७७ वा प्रजासत्ताक दिन दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी श्री एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूल येथे अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मशाल रॅलीने करण्यात आली. त्यानंतर हाऊसवाइज मशाल परिक्रमा करत उपस्थित मान्यवरांना शिस्तबद्ध सलामी देण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये एकता, शिस्त, त्याग व देशसेवेची भावना निर्माण झाली.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली NCC परेड हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. शिस्तबद्ध पावले, आत्मविश्वासपूर्ण हालचाली व राष्ट्रनिष्ठेचे प्रभावी दर्शन या परेडमधून घडले. उपस्थितांनी या परेडचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.
कार्यक्रमात प्री-प्रायमरी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्ये व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी सादर केलेले स्वातंत्र्यसैनिक वीर भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यावरील नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला. या सादरीकरणातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये इयत्ता १० वी मध्ये प्रथम १ ते ५ क्रमांक मिळवलेल्या व विषयात अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, कर्तव्यभावना व शैक्षणिक उत्कृष्टतेची प्रेरणा देणारा ठरला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री. लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या सौ. विद्या लक्ष्मण, शाळेतील क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व सादरीकरण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाशजी मुंदडा, चेअरपर्सन सौ. छायाभाभी मुंदडा, सचिव श्री. अमेय मुंदडा, सहसचिव श्री. योगेशजी मुंदडा, श्री. नरेंद्रजी मुंदडा, श्री. राकेशजी मुंदडा, श्री. पंकजजी मुंदडा, ॲडमिनिस्ट्रेटर सौ. दीपिका मुंदडा तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य, प्रायमरी प्राचार्या, प्री-प्रायमरी को-ऑर्डिनेटर सौ. योजना ठक्कर, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.