लोक न्यूज
अमळनेर तालुक्यात उबाठा गटाची शिवसेना संपली असे अनेकांना वाटले होते, मात्र आज टाऊन हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यातील प्रचंड गर्दी पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. “शिवसेनेची ताकद कमी असली तरी अनेकांचे राजकारण बिघडवण्याची ताकद अमळनेरच्या शिवसेनेत आहे,” असे प्रतिपादन शिवसेना उबाठा गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरविण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
वाघ पुढे म्हणाले, “तालुक्यात विकासाचा केवळ गवगवा केला जात आहे, परंतु सामान्य नागरिक अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. अनेक पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहेत, तर नव्या रस्त्यांसह जुने रस्तेही खड्ड्यांनी विद्रूप झाले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना हीच जनतेचा कैवारी पक्ष आहे. शिवसैनिक स्वतःच्या नव्हे, तर जनतेच्या सुखासाठी लढतो. सज्ज व्हा आणि आपली ताकद दाखवा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
उपनेत्या शुभांगी पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका करताना म्हटले, “हे शब्द न पाळणारे करंटे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा वाढवून व्यापाऱ्यांना पोसणारे सरकार आहे. अमळनेर तालुक्याला अवकाळी पावसाच्या मदतीतून वगळण्यात आले. आता मतदानातूनच त्यांना वगळा,” असे त्यांनी संतप्तपणे सांगितले.
जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील म्हणाले, “आगामी निवडणुका साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतींचा वापर करून लढवल्या जातील. जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय ही लढाई लढायची आहे. शिवसैनिकांनी फक्त सतर्क राहावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, पियुष गांधी, महिला आघाडी प्रमुख महानंदा पाटील, जयदीप पाटील, रमेश पाटील, संपर्क प्रमुख कारभारी आहेर, उपजिल्हा प्रमुख नितीन निळे यांनी भाषणे केली.
कार्यक्रमास तालुका प्रमुख राजेंद्र मराठे, नरेंद्रसिंग ठाकोर, देवेंद्र देशमुख, चंद्रशेखर भावसार, बाळासाहेब पवार, मोहन भोई, विलास पवार, युवसेना प्रमुख गोकुळ कोळी, बाळासाहेब पाटील, रवींद्र पाटील, महिला आघाडीच्या मनीषा परब, उज्वला कदम, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शिवसेना प्रेमी उपस्थित होते.