लोक न्यूज
कधी काळी सकाळच्या धावपळीमध्ये सायकलवरून धावत शाळेच्या गेटमध्ये पोहोचणारी ती मुलं… आज ३५ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच शाळेच्या गेटमधून, पण यावेळी आठवणी घेऊन, प्रेम आणि आदराने भरलेल्या नजरेने पुन्हा त्या वर्गांकडे त्यांची पावले वळवणार आहेत.
अमळनेरच्या प्रतिष्ठित प्रताप हायस्कूलमध्ये २५ ऑक्टोबर रोजी “पुन्हा तीच शाळा, पुन्हा तेच विद्यार्थी” या भावस्पर्शी संकल्पनेखाली माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. १९९० ते २०२४ या कालावधीत शाळेत शिक्षण घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे.
या स्नेहमेळाव्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे, कालांतराने बंद पडलेल्या या शाळेला पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने जाग येणार आहे. शाळेच्या दगडी भिंती, गच्चीवरून डोकावणाऱ्या आठवणी, मोकळ्या मैदानावर धावणाऱ्या पावलांचे प्रतिबिंब, हे सर्व पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.
कार्यक्रमात सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत अनेक आकर्षक उपक्रम राबविले जातील. जुन्या शिक्षकांना रॉयल एन्ट्री देऊन सत्कार करण्यात येणार आहे. वर्गात पुन्हा एकदा बसून त्याच शिक्षकांशी संवाद साधताना, अनेकांच्या डोळ्यांत नकळत अश्रू उभे राहतील. पारंपरिक प्रार्थना, शाळेतील खेळ, आठवणींचा कार्यक्रम, भोजन व्यवस्था आणि फोटो सेशन्स – सगळं काही जुन्या काळाची आठवण करून देणारं.
*भावनिक नात्याला उजाळा*
माजी विद्यार्थी समितीच्या मते,
“आम्ही केवळ एक गेट-टुगेदर करत नाही, तर शाळेशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याला उजाळा देत आहोत. ही शाळा फक्त शिक्षणाचं केंद्र नव्हती, ती आपली दुसरी आई होती. तिचं अस्तित्व पुन्हा जपायचं आहे, ही आमची जबाबदारी आहे.”
हा स्नेहमेळावा म्हणजे भूतकाळाच्या आठवणींची सजीव उजळणी आहे. प्रताप हायस्कूलचा सुवर्ण इतिहास नव्याने जिवंत होणार असून, आजच्या तरुण पिढीला त्या संस्कारांची आणि मूल्यांची ओळख होणार आहे.
*एक भावनिक सोहळा*
२५ ऑक्टोबर हा दिवस केवळ भेटीचा नाही, तर काळाच्या संधीवर लिहिलेल्या प्रेमाच्या आणि कृतज्ञतेच्या ओळींचा एक भावनिक सोहळा ठरणार आहे.