लोक न्यूज
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार ऑक्टोबर २०२५ हा महिना देशभरात ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध माहितीपर कार्यक्रम, जनजागृती मोहिमा आणि प्रशिक्षण उपक्रम आयोजित केले जात आहेत.
या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते (अमळनेर विभाग) यांनी नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, सध्या मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाईन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे.
(DYSP) कोते म्हणाले,
“केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार सायबर जनजागृतीसाठी काही सोप्या भाषेत तयार केलेल्या ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स तयार करण्यात आल्या आहेत. त्या सर्व नागरिकांनी नक्की पाहाव्यात. यातून सायबर गुन्ह्यांचे प्रकार, फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून बचावाचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळेल.”
त्यांनी पुढे सांगितले की,
“अनजान व्यक्तीकडून आलेले कॉल, लिंक, OTP, बँक तपशील मागणारे संदेश किंवा लॉटरीचे आमिष दाखवणारे फोन यापासून सावध राहा. कोणालाही आपली वैयक्तिक माहिती, बँक खाते क्रमांक किंवा पासवर्ड देऊ नका. कोणतीही फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.”
सायबर गुन्हे थांबवण्यासाठी जनतेच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की,
“पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे सायबर सुरक्षेची साखळी मजबूत केली, तर सायबर गुन्हेगारांना थारा मिळणार नाही. प्रत्येक नागरिक सायबर-जागरूक झाला पाहिजे.”
पोलीस विभागाच्यावतीने यासाठी जनजागृती व्हिडिओ, माहितीपत्रके आणि कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन स्वतःचे आणि आपल्या परिसरातील नागरिकांचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करावे, असे आवाहनही (DYSP) कोते यांनी केले आहे.