लोक न्यूज
अमळनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सामाजिक कार्यकर्ते उमाकांत ठाकूर यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपली मनापासून इच्छा व्यक्त केली आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले ठाकूर हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून, नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत आले आहेत.
उमाकांत ठाकूर यांनी आपल्या भूमिकेबाबत बोलताना सांगितले की, “मला सत्तेची लालसा नाही, परंतु जनतेच्या सेवेसाठी आणि शहराच्या विकासासाठी काम करण्याची खरी इच्छा आहे. कोणत्याही समाजघटकाने, कोणत्याही कारणासाठी हाक दिली तरी मी नेहमी मदतीसाठी धावून जातो. गोरगरीब, दुर्बल आणि वंचित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव सज्ज राहीन.”
ठाकूर यांच्या या निर्णयाचे शहरातील काही नागरिक आणि समर्थकांनी स्वागत केले आहे. त्यांचा जनसंपर्क, नम्र स्वभाव आणि तत्पर सेवा वृत्ती पाहता, जनता त्यांना मान्यता देईल असा विश्वास त्यांच्या जवळच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
अमळनेरच्या राजकारणात सध्या अनेक नवे चेहरे पुढे येत असताना, उमाकांत ठाकूर यांचे नाव या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेत आले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि जनतेशी असलेल्या जवळिकीचा फायदा आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
नगराध्यक्ष पदासाठी उमाकांत ठाकूर यांची उमेदवारी जाहीर होईल का, हे लवकरच स्पष्ट होणार असले तरी, त्यांच्या इच्छेने स्थानिक राजकारणात चांगलीच चुरस निर्माण केली आहे.