अमळनेर :लोक न्यूज :
अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्र. डांगरी येथे 1999-2000 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल पंचवीस वर्षांनंतर वर्गमित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र आल्याने वातावरण भावनांनी ओथंबून गेले.
जुन्या आठवणींना उजाळा
स्नेहमेळाव्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बी. एस. चौतमल होते. यावेळी उपस्थित आजी-माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
२५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र
२५ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यानंतरही वर्गमित्र एकत्र आले, हे दृश्य उपस्थितांसाठी भावनिक ठरले. ४२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३२ जणांनी उपस्थित राहून स्नेहमेळाव्याची शोभा वाढवली. शाळेच्या आवारात सर्वांनी एकमेकांची विचारपूस करत आनंदी वातावरण निर्माण केले. वर्गात जाऊन त्यांनी शिक्षकांकडून घेतलेल्या अध्यापनाच्या आठवणी ताज्या केल्या.
खेळ, नृत्य आणि हशांनी रंगला कार्यक्रम
कार्यक्रमात विविध खेळ, मनोरंजनपर उपक्रम आणि नृत्य यांचा समावेश होता. काहींनी मनसोक्त नाचत जुन्या मित्रांसोबत हास्यविनोदाचा वर्षाव केला. 1999-2000 बॅचतर्फे शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक प्रतिमा भेट देण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक छायाचित्र काढले.
संघटन आणि यश
स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी सुनील कोळी व इतर वर्गमित्रांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश शिसोदे यांनी केले, तर राकेश पवार यांनी आभार मानले.
माजी विद्यार्थ्यांनी पुढील काळातही अशाच गाठीभेटी आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला.