अमळनेर (लोक न्यूज) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अमळनेर तालुका शहर विकास आघाडी पुरस्कृत भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा शहरातील कलागुरू मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.
या मेळाव्यात माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील व भारती चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने सभागृह हाऊसफुल झाले होते.
“महायुतीचा फॉर्म्युला अमळनेर पॅटर्न ठरेल” – आमदार अनिल पाटील
मेळाव्यात बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले,
“या भूमीतील भूमिपुत्र म्हणून मला कार्यकर्त्यांनी दोन वेळा आमदारकीची व स्मिताताईंना खासदारकीची संधी दिली. यासाठी सर्व कार्यकर्ते एकदिलाने लढले. आता पुन्हा आपण मतभेद न ठेवता एकसंघ राहून कार्यकर्त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. अमळनेरचा हा महायुतीचा पॅटर्न जिल्हाभर राबविण्याचा आमचा निर्धार आहे.”
ते पुढे म्हणाले,
“आगामी निवडणुका महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार लढवल्या जाणार आहेत. चांगल्या कार्यकर्त्यांना, अगदी इतर पक्षांतीलही, संधी दिली जाईल. उमेदवार निवड प्रक्रियेसाठी विशेष कोअर कमिटी गठित करण्यात येणार असून, लोकाभिमुख आणि जनतेच्या मनातील उमेदवारालाच तिकीट दिले जाईल.”
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार
अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांविषयी बोलताना आमदार पाटील म्हणाले,
“फक्त निवेदन देऊन निधी मिळत नाही. मी स्वतः उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री व मदत पुनर्वसन मंत्र्यांकडे पीडित शेतकऱ्यांना मदत देण्याची विनंती केली आहे. दिवाळीनंतरच्या कॅबिनेट बैठकीत मदतीचा निर्णय होईल, अशी आशा आहे.”
जातीयवादाला थारा नाही – सर्वसमावेशक उमेदवारांवर भर
मराठा समाजातील कार्यकर्त्यांना उद्देशून आमदार पाटील म्हणाले,
“विधानसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा काही जण जातीयवाद आणण्याचा प्रयत्न करतील, पण आता आपण त्या दिशेने जाणार नाही. दिलेला उमेदवार कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याच्या पाठीशी उभे राहा. चांगल्या कार्यकर्त्यासाठी थोडं थांबावं लागलं तरी नाराजी दाखवू नका.”
नंदुरबारकडे विशेष लक्ष – शिरीष चौधरींवर टोला
“या वेळी माझं विशेष लक्ष नंदुरबारकडे असणार आहे. मी अपघाताने नाही तर जनतेच्या विश्वासाने ३० वर्षांपासून राजकारणात आहे. काही जण पाच वर्ष अपघाताने आमदार झाले आणि स्वतःला नेते समजू लागले,” असा थेट टोला पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरींना लगावला.
“बिनविरोध निवडणूकही शक्य” – माजी आमदार साहेबराव पाटील
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील म्हणाले,
“अमळनेरची जनता उदार आहे. मी अपक्ष निवडून आलो आणि माझ्या पत्नीला नगराध्यक्षा बनवले. अनिलदादांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी मीच पुढाकार घेतला. आम्ही दोघं एकत्र आलो तर अमळनेरमध्ये बिनविरोध निवडणूक होणं अशक्य नाही. सर्वांना सोबत घेऊन काम केल्यास यश निश्चित आहे.”
मान्यवरांची उपस्थिती आणि सूत्रसंचालन
व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील व भारती चौधरीविनोदभय्या पाटीलनाना रतन चौधरीसभापती अशोक पाटीलजितेंद्र झाबकप्रभाकर पाटीलअशोक आधार पाटीलडॉ. अशोक पाटीलबिरजू लांबोळेगिरीश पाटीलप्रवीण साहेबराव पाटीलसत्तार मास्तरप्रकाश वाघजबीर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले, सूत्रसंचालन विनोद कदम यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मानले.
जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या मेळाव्याला तालुका व शहरातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.