लोक न्यूज
अमळनेर, जि. जळगाव स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग जळगावच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर व मोफत डोळे तपासणी शिबिरास ग्रामस्थ, सामाजिक संस्था व राजकीय संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात गावचे सुपुत्र शहीद जवान विजय साळुंखे यांच्या स्मारकाला माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन शहीद जवान विजय साळुंखे यांच्या मातोश्री लीलाबाई साळुंखे यांच्या हस्ते फीत कापून झाले.

या प्रसंगी सरपंच आशाबाई भिल, उपसरपंच भिकन आबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, युवती जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, उमाकांत भाऊसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून स्वेच्छेने रक्तदान केले. डोळे तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन व उपचाराची सुविधा दिली.

या उपक्रमाचे आयोजन सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, विद्यार्थी अध्यक्ष कृष्णा बोरसे, तालुकाध्यक्ष मयूर बोरसे, ऋषिकेश बोरसे, हुजेफा पठाण, प्रणव चौधरी, आदित्य पाटील तसेच फ्रेंड्स कब्बडी संघ, मारवड यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांनी सर्व मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.