लोक न्यूज
अमळनेर-नवी दिल्ली येथे संसद भवनात केंद्रीय जलशक्तीमंत्री नामदार सी. आर. पाटील यांची माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या समवेत विशेष भेट घेतली.निम्न तापी प्रकल्प (पाडळसरे धरण ) चां समावेश केंद्र सरकारच्या “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)” मध्ये करण्यात आल्याबद्दल त्यांनी नामदार सी. आर. पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.तसेच केंद्रीय योजनेत पहिल्या टप्प्याचा समावेश करून 2700 कोटी पैकी 859 कोटी निधीचा हातभार लावला याचप्रमाणेच आता दुसऱ्या टप्प्यासाठी देखील अशीच भरीव मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच पाडलसरे धरण भेटीचे निमंत्रणही दिले. यावर नामदार पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी व तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी दुसऱ्या टप्प्यासही केंद्र सरकारकडून भरघोस सहाय्य देण्याचे आश्वासन दिले.दरम्यान यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेत आमदार पाटील यांनी माहिती देताना सांगितले की धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश झाल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत पहिल्या टप्प्यातच दुसऱ्या टप्प्यातील अंशतः येणाऱ्या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर प्रकल्पावरून पहिल्या टप्प्यातच बंद पाईपलाईन द्वारे शेतीला पाणी देण्यात येणार असल्याने जवळपास 83 हजार एकर जमीन ओलिताखाली येऊन संपूर्ण बागायती होणार आहे.उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील 18 हजार हेक्टर जमीनीचे सर्वेक्षण करण्याबाबत नियामक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे.यामुळे दुसऱ्या टप्प्यासाठी देखिल केंद्र शासनाची अशीच मदत व्हावी अशी अपेक्षा आमदार पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली.तसेच धरण भेटीसाठी निमंत्रण दिल्याने लवकरच प्रकल्पाला भेट देण्याची ग्वाही मंत्री श्री पाटील यांनी दिली.
दरम्यान धरणाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याने अमळनेर मतदारसंघासह जळगाव जिल्हा आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाला दिलासा मिळणार असून, शेती व ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.