लोक न्यूज
अमळनेर : तालुक्यातील आनोरे येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्यावरून दोन गटात लोखंडी  पाईप , लाठ्याकाठ्या , लाकडी फळ्यानी हाणामारी झाली असून दोन्ही गटाच्या  नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    भरत सुभाष पाटील याने फिर्याद दिली की १५ रोजी आनोरे गावात हळदीचा कार्यक्रमात नाचताना दिनेश सुनील पाटील याचा धक्का पुतण्याला लागला. त्यावरून वाद झाले. त्यांनतर घरी गेल्यावर दिनेश सुनील पाटील हा हातात चाकू , भरत सुनील पाटील हातात लोखंडी रॉड , सुनील शिवदास पाटील काठी , कुणाल मधुकर पाटील हातात लोखंडी सळई घेऊन आणि सोबत आशाबाई  सुनील पाटील घरात घुसले.दिनेश ने त्याच्या हातातील चाकूने पुतण्या निखीलवर वार केला. निखिल जखमी होऊन  त्याच्या हातातून रक्त वाहू लागले. तोच  सुनील पाटील याने लोखंडी रॉड भरतच्या डोक्यात टाकला. तर दिनेश ने भावजयीचे ब्लाउज फाडले आणि कुणाल ने हातातील लोखंडी सळईने मारहाण केली. आजूबाजूच्या लोकांनी भांडण आवरले जाता जाता पाचही जणांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पाचही जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),३३३,१८९(२) ,१९१ (१),१९१(३),१९० ,३५२ , ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.
      तर दुसऱ्या गटातर्फे भरत सुनील पाटील यांनी फिर्याद दिली की हळदीच्या कार्यक्रमात वाद झाल्यावर आम्ही घरी आलो तेव्हा रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बँड बंद झाल्यावर सनी शरद पाटील लाकडी फळी , गुड्डु भरत पाटील लाकडी काठी  , भरत सुभाष पाटील लोखंडी पाईप  आणि  शरद सुभाष पाटील लाकडी फळी घेऊन आमच्या घराच्या मागे आले. शिवीगाळ करत शरद ने हातातील लाकडी फळीने डोक्यावर , हातपायावर मारून दुखापत केली , तर गुड्डू याने काठीने आणि भरत सुभाष पाटील याने वडील सुनील पाटील यांना लोखंडी पाईपने डोक्यावर ,पाठीवर आणि हातावर मारून दुखापत केली. तर  भाऊ दिनेशला सनी आणि शरद पाटील यांनी लाकडी काठी आणि फळीने मारहाण केली. आई आशाबाई भांडण आवरत असताना तिलाही मारहाण केली. याबाबत चौघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता ११८(१),११७(२), ३३३, ३५२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.