लोक न्यूज
अमळनेर : अमळनेर शहरातील श्रीराम कॉलनी, शिरूड नाका परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा अमळनेर पोलिसांनी उघडकीस आणला असून, या प्रकरणी एका संशयित मोटारसायकल चोरास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची एक मोटारसायकल तसेच अन्य एक मोटारसायकल अशा दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
अमळनेर येथील श्रीराम कॉलनी, शिरूड नाका परिसरातील रहिवासी हरेश गंभीर चौधरी यांची हिरो होंडा कंपनीची सीडी डीलक्स मोटारसायकल क्रमांक एमएच १९ ए.क्यू. २१६२, अंदाजे २५ हजार रुपये किमतीची, अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत चौधरी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर ७ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१२/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली की, विनायक उखा पाटील (रा. वेळोदे, ता. चोपडा, जि. जळगाव) हा चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्याच्या प्रयत्नात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने संशयित विनायक पाटील याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची विश्वासात घेऊन चौकशी केली असता चोरीच्या मोटारसायकलींबाबत महत्त्वाची माहिती समोर आली.
पोलिसांनी त्याच्याकडून फिर्यादी हरेश चौधरी यांच्या मालकीची चोरीस गेलेली हिरो होंडा सीडी डीलक्स मोटारसायकल (एमएच १९ ए.क्यू. २१६२) तसेच अन्य एक मोटारसायकल जप्त केली आहे. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते आणि अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक शरद काकळी ज, पोलीस हवालदार प्रमोद पाटील, पोलीस अंमलदार नरेश बडगुजर, नितीन मनोरे आणि उज्वल पाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला.
पोलिसांच्या या कारवाईमुळे अमळनेर परिसरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून, जप्त करण्यात आलेल्या दुसऱ्या मोटारसायकलबाबतही तपास सुरू आहे. संशयिताविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.