लोक न्यूज
अमळनेर : तालुक्यातील कावपिंप्री येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. संबंधित मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी वारंवार त्रास व दबाव दिल्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या आजीने केला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१ (२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत मुलगी अनुष्का रविंद्र सपकाळे (वय १६) ही कावपिंप्री येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होती. वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आजीसोबत राहत होती.
आजीच्या फिर्यादीनुसार, घरामागे राहणारा स्वप्निल जयवंत पवार हा अनुष्केला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी वारंवार त्रास देत होता. तसेच स्वप्निलची बहीण रुपाली आनंद अहिरे हीदेखील अनुष्केवर त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचे अनुष्केने आजीला सांगितले होते.
अनुष्केने याबाबत आजीला माहिती देताना या त्रासामुळे मानसिक तणाव येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आजीने स्वप्निल व रुपाली यांना बोलावून अनुष्का अल्पवयीन असून शिक्षण घेत असल्याने तिला त्रास देऊ नये, अशी समज दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, त्यानंतरही त्रास सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्वप्निल शाळेत येऊन भेटत असून रस्ता अडवून प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचेही अनुष्केने आजीला सांगितले होते. याबाबत पुन्हा दोघांना समज दिल्यानंतर त्यांनी आजीलाही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेच्या दिवशी आजी अंत्यविधीसाठी गेली होती
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त अनुष्का शाळेत गेली होती. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ती घरी परतली. त्यानंतर दुपारी एका नातेवाईकाच्या निधनाची माहिती मिळाल्याने आजी अंत्यविधीसाठी भरवस येथे गेली. त्यामुळे त्यावेळी अनुष्का घरी एकटी होती.
दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या महिलेने आजीला फोन करून अनुष्का घरात बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती दिली. आजी तत्काळ कावपिंप्री येथे परतली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने अनुष्केला उपचारासाठी अमळनेर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
घटनेपूर्वी संशयित घरात गेल्याचा नातेवाईकांचा दावा
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, घटनेच्या काही वेळापूर्वी स्वप्निल अनुष्काच्या घरात गेल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळाने रुपाली तेथे आली होती आणि अनुष्कासोबत वाद झाल्याचेही सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर अनुष्केला दोघांनी वारंवार त्रास दिल्याचा आरोप करत तिच्या आजीने पोलिसांत फिर्याद दाखल केली.
आजीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भाग ५ गुरनं. ४७०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची प्रत संबंधित सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे करीत आहेत. आरोपींविरुद्ध करण्यात आलेले आरोप तपासाचा विषय असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती व संबंधितांची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.