वैजापूर,लोक न्यूज
मराठवाड्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागांत दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. शेती आणि शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी असतानाही वैजापूर शहरासह तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपली परंपरा आणि संस्कृती जपत गुरुवारी (ता. १०) मोठ्या उत्साहात बैल पोळा सण साजरा केला.
पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना रंगीबेरंगी झूल, गोंडे, फुलांच्या माळा व विविध सजावटीच्या साहित्याने सजविले होते. सायंकाळच्या सुमारास शहरातील पाटील गल्ली येथील श्री मारुती मंदिरात सजविलेल्या बैलांना आणून मारुतीचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर बैलांना शहरातील मुख्य रस्त्यावरून संकटमोचन हनुमान मंदिरापर्यंत नेण्यात आले. तेथेही बैलांना हनुमानाचे दर्शन घडवून शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह घरी परतत हा पारंपरिक सण साजरा केला.
घरी परतल्यानंतर सुहासिनींनी बैलांची विधिवत पूजा करून त्यांची आरती केली. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून शेतकरी कुटुंबांनी आपल्या कष्टकरी साथीदाराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा यावेळी प्रकर्षाने दिसून आला.
दरम्यान, इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी ‘बैल पोळा’ ही कविता लिहिणारे कवी धोंडीरामसिंह राजपूत यांनीही आपल्या बैलांसोबत पोळा साजरा केला. त्यांच्या समवेत आधार ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव साळुंके तसेच श्री. वाघ हेही बैल पोळा उत्सवात सहभागी झाले होते.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक अडचणींचा सामना करत असला, तरी आपल्या कृषी संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या बैल पोळ्याचा उत्साह मात्र कमी झालेला दिसला नाही. वैजापूर शहराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातही बैल पोळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोळा उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.