अमळनेर (लोक न्यूज) : मंगळ ग्रह मंदिराच्या पार्किंगसमोरील रस्त्यावर शिक्षिकेची मोटरसायकल अडवून तिचा हात धरत, ‘तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत तिला अंगावर ओढल्याचा धक्कादायक प्रकार १ सप्टेंबर रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडला. या प्रकरणी जळोद येथील हिरालाल ज्ञानेश्वर रायसिंग याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात विनयभंगासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, संबंधित शिक्षिका आपल्या सहकाऱ्यांसोबत आपापल्या मोटरसायकलीने मंगळ ग्रह मंदिराच्या पार्किंगसमोरील रस्त्यावरून जात होत्या. यावेळी शिक्षिका केदार गुणवंतराव देशमुख यांच्या मोटरसायकलवर मागे बसल्या होत्या.
दरम्यान, हिरालाल रायसिंग हा मोटरसायकलवरून तेथे आला. त्याने शिक्षिका प्रवास करत असलेली मोटरसायकल अडवली. त्यानंतर खाली उतरून शिक्षिकेचा हात धरला आणि ‘तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत तिला अंगावर ओढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर शिक्षिकेने घरी जाऊन घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी अमळनेर पोलिस ठाणे गाठून संबंधित तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली.
फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ७४ आणि १२६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.