लोक न्यूज
अमळनेर : येथील मुंदडा नगर परिसरात सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री त्रिविक्रम मठाचा शुभारंभ गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमीच्या शुभमुहूर्तावर अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात झाला. देशातील सातवा आणि खान्देशातील पहिला श्री त्रिविक्रम मठ अमळनेर नगरीत सुरू झाल्याने परिसरातील श्रद्धावानांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या संकल्पनेनुसार मानवी जीवनात आध्यात्मिक आधार मिळावा, भक्तिमय वातावरणात मनःशांती अनुभवता यावी आणि ध्यानधारणा व नामस्मरणासाठी पवित्र जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मठाची स्थापना करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत धार्मिक विधी व पूजन सोहळा पार पडला. त्यानंतर आतषबाजी करण्यात आली आणि भाविकांना दर्शनासाठी मठ खुला करण्यात आला. धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांसह खान्देशातील असंख्य श्रद्धावानांनी या सोहळ्यात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, जयश्रीताई पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, अभियंता सौरभ बागड, प्रांताधिकारी मयुर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, विविध नगरसेवक, प्रतिष्ठित डॉक्टर, खान्देश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, विनोद भैय्या पाटील, बिपीन पाटील, पत्रकार, व्यापारी, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना परिवार, अमळनेर यांच्या वतीने सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते.
कलियुगात नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व असून भक्ती हा भारतीय संस्कृतीचा आधार, पाया आणि कणा आहे. शरीर आजारी पडल्यास डॉक्टर उपचार करतात; मात्र मन अस्वस्थ झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो आणि समाजाचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यास त्याचे परिणाम देशावरही होतात. मनातील विकारांवर मात करून मानसिक व आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याची शिकवण उपासना परिवाराच्या माध्यमातून दिली जाते. याच उद्देशाने सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांनी गावोगावी सामूहिक उपासना केंद्रे सुरू करण्याबरोबरच वैयक्तिक नामस्मरणासाठी श्री त्रिविक्रम मठांची निर्मिती केली आहे.
अमळनेरातील या मठात श्रद्धावानांना शांत वातावरणात नामस्मरण, मनोमन पठण आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करून आध्यात्मिक उन्नती साधता येणार आहे. ललिता पंचमीच्या शुभदिनी झालेल्या या शुभारंभामुळे अमळनेरच्या धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात आणखी एका महत्त्वपूर्ण केंद्राची भर पडली आहे.