लोक न्यूज
वैजापूर : शहरातील एकल महिला, परित्यक्ता तसेच अविवाहित पात्र महिलांनी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागात ५ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करून शासनाच्या नियोजित योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी नगराध्यक्षा शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी यांनी केले.
नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एकल महिला नावनोंदणी’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना शिल्पाताई परदेशी म्हणाल्या की, शहरातील एकही पात्र एकल महिला नावनोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी नगरसेविकांनी आपल्या-आपल्या प्रभागात जनजागृती करून महिलांना नावनोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. शहरात आतापर्यंत सुमारे साडेपाचशे एकल महिलांची नावनोंदणी झाली असून, शासनाने नावनोंदणीसाठी ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक व समाजकार्यकर्ते ठा. धोंडीरामसिंह राजपूत यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी मोठ्या संख्येने नावनोंदणी करावी आणि उपलब्ध योजनांचा योग्य उपयोग करून स्वावलंबी बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
नगरपालिकेने शासनाकडून ५ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणीची मुदत वाढवून घेतली असून, या कालावधीत पात्र महिलांनी आपली नावनोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत यांनी केले. यावेळी नगरसेविका ज्योतीताई जोशी, शेख सुमैय्या सोहेल बक्ष, मोनाली गणेश खैरे, पूजा अविनाश त्रिभुवन, जयश्री सावन चौधरी, सविता शैलेश चव्हाण, सुरेखा सुरेश घाटे यांच्यासह श्रीमती काकडे यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी दिवाकर त्रिभुवन यांनी आभार मानले.