लोक न्यूज
वैजापूर : देशातील विविध स्पर्धा परीक्षा तसेच शालेय, महाविद्यालयीन व विद्यापीठीय परीक्षा, शिक्षक भरतीसाठीच्या परीक्षा, शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी घेण्यात येणारी टीईटी व इतर परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच उपलब्ध होण्याचे प्रकार वारंवार समोर येत असल्याने परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या आणि रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत असून, पेपरफुटीच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कठोरात-कठोर कायदे करावेत, अशी मागणी धोंडीरामसिंह ध राजपूत, वैजापूर यांनी केली आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. आर्थिक अडचणी, कौटुंबिक परिस्थिती आणि अनेक संकटांवर मात करून विद्यार्थी अभ्यास करतात. मात्र, प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच काही व्यक्तींच्या हातात पोहोचत असल्यास प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आणि संताप निर्माण होण्याबरोबरच संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे.
राजपूत यांनी म्हटले आहे की, प्रश्नपत्रिका विकत घेऊन परीक्षेत यश मिळविण्याची प्रवृत्ती ही केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित नसून त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण समाजावर होतात. अशा गैरप्रकारातून अयोग्य व्यक्ती महत्त्वाच्या पदांवर पोहोचल्यास प्रशासन, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा गैरप्रकार हा राष्ट्रीय पातळीवरील गंभीर प्रश्न म्हणून हाताळण्याची गरज आहे.
संशयितांची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी
पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांची सखोल चौकशी करून या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचावे. प्रश्नपत्रिका फुटण्यामागे कोण आहेत, त्याचे आर्थिक व्यवहार कोण करतात, प्रश्नपत्रिका कोणाकडून आणि कोणत्या माध्यमातून बाहेर जाते, या सर्व बाबींचा तपास करून संपूर्ण साखळी उघड करावी, अशी मागणी राजपूत यांनी केली आहे.
केवळ काही व्यक्तींवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नसून, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहणार नाही, अशी सुरक्षित आणि पारदर्शक व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार करण्यास कोणीही धजावणार नाही, असा कायद्याचा धाक निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशात कायद्यांची पायमल्ली थांबविण्याची गरज
देशातील विविध क्षेत्रांमध्ये कायद्यांचे उल्लंघन वाढत असल्याची चिंता व्यक्त करताना राजपूत यांनी कायद्याचे पालन ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेने देशाच्या शासनव्यवस्थेला कायदेशीर चौकट दिली आहे. मात्र, नागरिकांनी कायद्याचे पालन न केल्यास सामाजिक शांतता, सुव्यवस्था आणि देशाच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
महिला व मुलींवरील अत्याचार, अपहरण, मारहाण, हत्या, छेडछाड तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारे विविध प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांवर हल्ले करणे, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, वाहनांची जाळपोळ करणे, सार्वजनिक व शासकीय मालमत्तेची तोडफोड करणे, उच्च पदस्थ व्यक्तींचा अपमान करणे, बॉम्बस्फोटासारख्या हिंसक घटना घडविणे आणि परवानाधारक शस्त्रांचा गैरवापर करणे यांसारख्या घटनांवरही कठोरपणे नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कायद्याचे राज्य मजबूत झाले तरच समाजात शांतता
समाजात शांतता, सुरक्षितता आणि देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने कायद्याचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कायदे पायदळी तुडविण्याची प्रवृत्ती वाढल्यास समाजात अराजकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, दोषींवर तातडीने कारवाई आणि नागरिकांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.
“गुणवंत, ज्ञानवंत, कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी व व्यावसायिक पुढे यावेत, यासाठी परीक्षा व्यवस्था पूर्णपणे पारदर्शक असणे आवश्यक आहे. पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकारांना मुळापासून आळा घातल्यासच गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि देशाची प्रशासकीय व सामाजिक व्यवस्था अधिक सक्षम होईल,” असा विश्वास धोंडीरामसिंह ध राजपूत यांनी व्यक्त केला.
— धोंडीरामसिंह ध राजपूत, वैजापूर, संभाजीनगर