लोक न्यूज
अमळनेर:- शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्रामसेवक व महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांवर झालेले प्राणघातक हल्ले अत्यंत निषेधार्ह आहेत. या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका राजपूत एकता मंचच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
      सदर निवेदनात 2 गंभीर घटनांचा उल्लेख आहे,सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील शिवरे, ता. पारोळा येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवक प्रल्हाद पाटील वय 52 वर्ष यांच्यावर काही ग्रामस्थांनी मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी पळत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तसेच अहिल्यानगर (अहमदनगर) शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी वय 31 वर्ष हे दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी पथदिव्यांची दुरुस्ती करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.या घडलेल्या घटनेत ते मृत्युमुखी पडले.

*मंचाची ठाम मागणी* 

      "कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण ही शासनाची जबाबदारी आहे" या भूमिकेतून वरील घटनांकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.राजपूत समाजातील दोन्ही पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी संबधित प्रशासनाला निर्देश द्यावेत तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी नम्र परंतु ठाम मागणी अमळनेर तालुका राजपूत एकता मंचाने केली आहे.मंचाने म्हटले आहे की, अशा घटनांमुळे केवळ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत नाही, तर प्रशासनाच्या कामकाजावरही विपरीत परिणाम होतो.
      प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी सदर निवेदन स्वीकारले यावेळी मंचचे अध्यक्ष रणजित पाटील,मच्छीन्द्र पाटील, अनिल पाटील,चेतन राजपूत,जयराम पाटील, विलास पाटील, जयदीप पाटील,डॉ ज्ञानेश्वर शिंदे,अमोल राजपूत,कुणाल गिरासे, भोजराज राजपूत,दिलीप पाटील,रोहिदास पाटील, विक्रम पाटील,सुनील पाटील,गणेश पाटील,प्रकाश पाटील,समाधान धनगर,अजयसिंग पाटील, आशिष राजपूत,भरतसिंग पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.