लोक न्यूज
अमळनेर:-अमळनेर विधानसभा मतदारसंघातील वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या, विशेषतः कृषी पंपांना दिवसा सुरळीत व पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत दि. ११ सप्टेंबर रोजी आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगिरे (धरणगाव विभाग), ज्ञानेश्वर अंबाडकर (अतिरिक्त कार्यकारी अभियंता, अमळनेर शहर उपविभाग), मनोज भावसार (उपकार्यकारी अभियंता, अमळनेर ग्रामीण उपविभाग), अविनाश सूर्यवंशी (सहाय्यक अभियंता, पायाभूत आराखडा, धरणगाव), तसेच सहाय्यक अभियंते चैतन्य वाघ, विनायक बोरसे व अमित चव्हाण उपस्थित होते.
बैठकीत तालुक्यातील विद्यमान वीज वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात सध्या एकूण १४ ठिकाणी ३३ केव्ही उपकेंद्रे कार्यरत असून वाढती वीज मागणी आणि विशेषतः कृषी क्षेत्रातील वाढता भार लक्षात घेता यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
*६ ठिकाणी अतिरिक्त रोहित्र, कामे प्रगतीपथावर*
तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी ६ उपकेंद्रात नवीन अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर (PTF) मंजूर करण्यात आले आहेत. यात ३३ केव्ही वावडे, ३३ केव्ही अंतुर्ली, ३३ केव्ही जानवे, ३३ केव्ही कलमसरे, ३३ केव्ही सरबेटे आणि ३३ केव्ही भरवस या उपकेंद्रांचा समावेश आहे. ही सर्व कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संबंधित उपकेंद्रांवरील भाराचे योग्य नियोजन होऊन वीज वितरण क्षमता वाढणार आहे.