लोक न्यूज
शहापूर, ता. अमळनेर : दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा करण्यात आला. त्यानिमित्त शहापूर, ता. अमळनेर येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा रि. पोस्टमास्तर श्री. बी. एस. पाटील आणि उपसरपंच श्री. नानाभाऊ शिरसाट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ओम स्वामी ठिबक कंपनी, अमळनेर यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात एकात्मता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षिका आणि अंगणवाडी सेविकांचा विशेष सत्कार सौ. सुनंदा नानाभाऊ शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनीच शिक्षकाची भूमिका साकारत ‘एक दिवस शिक्षक’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणली. विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून वर्गात अध्यापनाचा अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि शिक्षणाविषयीची आस्था निर्माण होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून भविष्यातील ‘नवीन लाईफ लाईन’ निर्माण करण्याचा संदेश दिला.
यावेळी गावातील आजी-माजी शिक्षकांचा तसेच उपस्थित ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांनी समाज घडविण्यात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा गौरव करत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या योगदानाचाही यावेळी विशेष उल्लेख करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून ‘शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून भावी पिढी घडविणारा शिल्पकार आहे’ हा संदेश अधोरेखित झाला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘एक दिवस शिक्षक’ या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी कौतुक केले.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.