अमळनेर, लोक न्यूज:
अमळनेर तालुक्यातील प्रोफेसर कॉलनीजवळील गलवाडे रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत असून, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे हा खड्डा वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अपघाताचा धोका संभवतो.
दिवाळीसारख्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या सणात नागरिक आपल्या कुटुंबीयांसह खरेदी, प्रवास आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावरील हा धोकादायक खड्डा एखाद्या निष्पाप नागरिकाच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या कुटुंबातील आनंदाचा दिवा विझल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, संबंधित रस्त्यावरून दररोज अनेक नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या समस्येकडे संबंधित विभागाचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे.
आमदारांनी तातडीने लक्ष घालावे!
अमळनेरचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष घालून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून खड्डा बुजविणे आणि रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे गरजेचे आहे.
प्रशासनाने अपघाताची वाट पाहण्याऐवजी अपघात रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. नागरिकांचा जीव महत्त्वाचा की कागदोपत्री विकासाचे दावे? हा प्रश्न आता अमळनेरकर विचारत आहेत.
दिवाळीचा सण आनंदात साजरा व्हावा, कोणत्याही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळू नये, यासाठी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने कार्यवाही करावी, हीच नागरिकांची अपेक्षा!