लोक न्यूज-
गेल्या दीड दोन महिन्यांपासून ज्याची चर्चा आणि तयारी आपण करत होतो तो "माजी विद्यार्थी मेळावा" विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादात शिक्षकवृंदाच्या उपस्थितीत दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी जोरदार संपन्न झाला.
बऱ्याच वर्षांनी जुने मित्र मैत्रिणी भेटल्याने गप्पांना, थट्टा मस्करीला उधाण आलं होतं. जुने सर भेटले की त्यांच्याशी बोलायला, नमस्कार करायला आणि स्वताची (सेल्फी) काढायला प्रत्येक गटाची गडबड बघण्यासारखी होती. त्यात मित्रांनी एखादी जुनी आठवण सांगितली की सातमजली हास्याचा कल्लोळ उठत होता. "शाळेतल्या सरांना भेटणं" याचा आनंद तर अवर्णनीयच. मला गंमतीने असं वाटलं की त्या समाधानाचे पण वेगवेगळे स्तर होते.
कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थी श्री मनोहर पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तर शालेय जीवनात घडलेल्या गमतीजमती ऐकताना सर्वजण भूतकाळात हरवून गेले होते.
तसेच ज्यांना १९९७ साली दहावीसाठी शैक्षणिक मार्गदर्शन केले आणि आज विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना पुन्हा भेटण्याची संधी मिळाल्याचा आणि त्यांच्याशी झालेल्या गप्पागोष्टीमुळे विशेष आनंद झाल्याचे मत यावेळी बोलताना तत्कालीन शिक्षक श्री उमेश कचवे सर यांनी व्यक्त केले.

"तुमच्या सारखे जीव लावणारे, सरांनशी ओळख ठेवणारे, त्यात आनंद मानणारे विद्यार्थी हेच आमचं ऊर्जास्थान" अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्यावर मूठभर मांस चढल्याशिवाय राहत नाही. आणि "हल्ली असे विद्यार्थी मिळत नाहीत" ही बागुल सराची खंत व "तुम्ही तरी तुमच्या मुलांना तुम्ही हे संस्कार पुढे दिले पाहिजेत" हे त्यांचं सांगणं जबाबदारीही खांद्यावर टाकतं. ही जबाबदारी आपण आनंदाने घेणार या विषयी मला शंका नसणार.
सर्व शिक्षकवर्गाने माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर अनमोल असे मार्गदर्शनही केले.यावेळी सर्व शिक्षकांचा स्मृती चिन्ह, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

 या कार्यक्रमाला श्री उमेश कचवे सर, श्री कैलास बागुल सर, मुख्याध्यापक श्री शांताराम कदम सर कलमाडी व श्री चतुर पाटील डोंगरगाव शिक्षक वर्ग उपस्थित होता.तर १९९७ साली दहावीत असणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश संदानशिव यांनी केले तर श्री अनिल शिंदे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री कैलास पाटील, श्री अजय पाटील, सौ सुलोचना पाटील यांनी विशेष प्रयत्न केला.


माहिती संकलन
योगेश पाटील