लोक न्यूज-
अमळनेर-तहसील कचेरी परिसरात तुम्ही कोठेही आला असाल आणि तुम्हाला लघुशंका आली असेल तर चिंता करू नका,याठिकाणी जिल्हा परिषदेच्या विश्राम गृहाच्या आवारात या आणि उघड्यावर कोठेही मोकळे व्हा,इतकी वाईट परिस्थिती या विश्राम गृहाची झाली असून यामुळे मैदानाचा परिसर प्रचंड घाणीने माखला आहे.
          जी जिल्हा परिषद ग्रामिण भगात स्वच्छतेचा संदेश देते,स्वच्छतेच्या विविध योजना राबविते, स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी अतोनात परिश्रम घेते त्याच जिल्हा परिषद मालकीच्या वास्तू मध्ये कुणीही येते आणि बिनधास्त घाण करून जाते आणि हा प्रकार अनेक दिवस नियमित सुरू राहूनही याच जिल्हा परिषदेचे अधिकारी हा प्रकार थांबविण्यासाठी काहीही पावले उचलत नाहीत किंवा कोणत्याही उपाययोजना करीत नाहीत,हे सगळं किती विचित्र असून अक्षरशः चीड निर्माण करणारा हा प्रकार आहे.अमळनेर शहरात महाराणा प्रताप चौकात गेल्या अनेक वर्षापासून हे जि प चे विश्रामगृह असून यातील खोल्यांची अवस्था फारशी चांगली नसल्याने दिवसेंदिवस हे विश्रामगृह दुर्लक्षित होऊ लागले आहे.याठिकाणी दर महिन्यात आरटीओ कॅम्प आणि अधूनमधून काही अधिकारी किंवा पदाधिकारी येथे येत असतात सुविधांअभावी मुक्काम मात्र टाळला जातो.विश्राम गृहाच्या वास्तू समोर भले मोठे मैदान असून हे मैदान कधीही नियमित स्वच्छ नसते,या विश्राम गृहास प्रवेशद्वार नसल्याने आवो जावो घर तुम्हाला अशी परिस्थिती आहे.तसेच आजूबाजूच्या परिसरात मुतारीची कमी असल्याने कुणालाही लघुशंका आली की तो थेट विश्राम गृहाच्या मैदानात प्रवेश करतो आणि उघड्यावरच मोकळा होत असतो,प्रत्यक्षात आजूबाजूला संपूर्ण रहिवास असताना आणि बऱ्याचदा महिला भगिनी बाहेर उभ्या असताना त्यांच्या देखतच काही महाभाग मोकळे होत असल्याने त्या भगिनीला तोंड लपवून आत जावे लागते,तसेच दररोज शेकडो लोक मोकळे होत असल्याने येथे घाणीचा प्रादुर्भाव वाढून कायम दुर्गंधी पसरत असते यामुळे आजूबाजूच्या लोकांना ही दुर्गंधी सहन करावी लागते तसेच डासांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो.विशेष म्हणजे विश्रामगृहाच्या बाजुला मोठे गणेश मंदिर असून येथे येणाऱ्या भक्तांना देखील दुर्गंधी चा त्रास होतो याशिवाय दरमहा आरटीओ कॅम्प साठी येणाऱ्या नागरिकांना आणि बाहेर विसाव्यासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना देखील याच त्रास होत असतो
        आजूबाजूच्या लोकांनी अनेकदा पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाकडे तक्रारी करूनही कुणीही लक्ष द्यायला तयार नसून स्वच्छतेचे अनेक पुरस्कार मिळविणाऱ्या  अमळनेर पालिकेसाठी देखील हे  खेदजनक आहे.तेव्हा तातडीने याठिकाणी स्वच्छता अभियान राबवून येथे प्रवेश द्वार बसवावे आणि कुणालाही सार्वजनिक प्रवेश बंद करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.