लोक न्यूज-
अमळनेर ः मंत्री नसतानाही अमळनेर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा भरीव निधी खेचून आणला. आमदार नसतानाही करोना कालावधीत अमळनेरकरांचे प्राण वाचावेत म्हणून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची उपलब्धी करून दिली. विरोधकांनी माझ्या प्रत्येक चांगल्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या कार्यकाळात मंजूर असलेली कामे होऊ नयेत म्हणून अधिकार्‍यांवर दबाव आणत ती कामे रोखण्याचा प्रयत्न केला. केवळ विरोधासाठी विरोध करणार्‍या विरोधकांनी माझ्या कार्यकाळात गावागावांसाठी मंजूर झालेल्या निधीपेक्षा जास्तीचा निधी आणून दाखवावा असे खुले आव्हान माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिले. 
तालुक्यातील अमळगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. गावाला मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा ह्दय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मा.आ.चौधरी बोलत होते. अमळगाव माझे आजोळ असून मी अमळगावच्या नावानेच ओळखला जातो. येथे जाती-धर्माचा संबंध नसून मामा आणि भाचा असे प्रत्येकाशी नाते आहे व ते कायम राहील. आमदारकीच्या कार्यकाळात येथे विविध विकासकामांसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली होती. मात्र विरोधकांनी येथील मंजूर कामे होऊ नयेत म्हणून दबाव आणला. तो दबाव झुगारून देत पुनश्‍च निधीचा मार्ग मोकाळ करत कामे पूर्ण व्हावीत म्हणून वाट मोकळी करून दिली आहे. अमळगावसाठी भविष्यात मल्टिपर्पज हॉल व विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कंबर कसण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते विश्‍वासराव पवार, गजानन चौधरी, विश्‍वास पाटील, हायस्कूलचे चेअरमन दीपक भोसले, उदय पाटील, निलेश पाटील, शेखर पाटील, नगरसेवक योगराज संदानशिव, किरण गोसावी, महाजन सर, रोशन कोळी, दामोदर पाटील, पंकज चौधरी, दशरथ पारधी, हर्षवर्धन मोरे, नरेंद्र चौधरी, प्रविण चौधरी, विलास चौधरी, बुधा कुंभार, राजेंद्र कुंभार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परेश चौधरी, सूत्रसंचालन भूषण चौधरी व आभार निखील पाटील यांनी मानले. 
 

मा.आ.चौधरींच्या कार्यकाळातील कामे.........
तत्कालिन आमदार शिरीष चौधरी यांनी अमळगाव येथे स्मशानभूमीची निर्मिती व पेवर ब्लॉक, रस्ता कॉक्रिटीकरण, नदीवरील संरक्षण भिंत, हायमास्ट लॅम्प, बाजार ओटा व पेवर ब्लॉक, देवमढी, प्रिकास्ट वॉल कंपाउंड, रस्ता डांबरीकरण, पक्क्या गटारी या कामांसाठी तब्बल 9 कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. अमळगावला सातत्याने पूराच्या पाण्याचा वेढा पडत असल्याने गावात पाणी शिरून मोठे नुकसान होत असे. तर अमळगावसह दोधवद, हिंगोणे, निंभोरा, कलाली, सात्री आदी गावांतील ग्रामस्थांना दळणवळणाची मोठी अडचण येत होती. मात्र मा.आ.चौधरींनी नदीवर संरक्षण भिंत बांधत ही समस्या कायमची निकाली काढली आहे.