
लोक न्यूज
नरडाणा :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद या गावी बाजार पेठेतील पाच दुकानांना चोरट्यांनी एकाच रात्रीतुन फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना बेटावद मध्ये घडली. या घटनेतील चोरटे एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, धुळे जिल्ह्याच्या थंडीने उच्चांक गाठला असून गारठ्याचा गरमागरम फायदा चोरट्यांनी उचलला आहे. बेटावद गावातील भर वस्तीतील एक दोन नाही तर सलग पाच दुकाने फोडून दोन लाख तीस हजार रुपयाची रोकड लंपास करण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. यात हरि नाटू पाटील यांचे संदीप किराणा, दगा पाटील यांचे वरद किराणा, अल्केश भाईशहा यांचे श्रीनाथ मेडिकल, गुजरात स्वीट मार्ट व महावीर जैन यांचे मोहित ट्रेडर्स अशा पाच दुकानांमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केली. यात मोहित ट्रेडर्स यांच्या दुकानात असलेली रोकड दोन लाख 28 हजार चोरण्यात चोरटे यशस्वी झालेत. तसेच त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व डी. व्ही. आर. चोरट्यांनी सोबतच नेले. परंतु दुसर्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे मात्र चोरी करताना कैद झालेत. तसेच चोरट्यांनी वापरलेली काळ्या रंगाची प्लेटिना कंपनीची दुचाकी सुद्धा सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. तसेच चोरटे अमळनेरच्या दिशेने पळताना सुद्धा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. पोलीस तपासात अंतर्गत हीच मोटरसायकल एम. एच. 19 डीटी 4722 अमळनेर येथील पुलाखाली सापडून आल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर नरडाणा येथील पोलिसांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली. तसेच तज्ञांचा श्वान पथकास याठिकाणी पाचारण करण्यात आले. परंतु श्वान पथक चोरट्यांचा मार्ग दाखवण्यात असमर्थ ठरले. यासंदर्भात नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून भा द वि कलम 457, 380, 511 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून, एस. जे. कोळी हे सपोनि मनोज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत. गुलाबी थंडीत चोरट्यांचा खिसा जरी गरम झाला असला, तरी घडलेल्या घटनेने चोरट्यांनी पोलिसांपुढे मात्र तगडे आव्हान उभे केले आहे. व्यापारी व नागरिकांमध्ये या चोरीच्या घटनेमुळे भयाचे वातावरण आहे पोलिसांनी नागरिकांना अनोळखी इसमावर पाळत ठेवावी, दुकानांच्या शटर ना झिरो नंबर चे कुलूप लावणे, रात्री दुकानाबाहेर दिवे सुरू ठेवणे, अश्या अनेक सूचना दिल्या आहेत.