लोक न्यूज-
शिंदखेडा : तालुक्यातील अक्कडसे येथील तापी नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करुन शिंदखेडा शहरातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे फोटो व व्हिडिओ शूटिंग केल्याच्या कारणावरुन माजी सरपंच अॅड मिलिंद कोळी यांच्यावर हल्ला झाला.याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात १५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात, माजी सरपंच अॅड. मिलींद देविदास सोनवणे- कोळी (३९) रा.औदंबर कॉलनी स्टेशन रोड शिंदखेडा, यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, भाऊसाहेब गोपीचंद कोळी, रावसाहेब गोपीचंद कोळी, राजेश सुभाष कोळी, अल्केश रावसाहेब उर्फ भुऱ्या कोळी, रावसाहेब कोळी याचे जावाई संदीप पुर्ण नांव माहित नाही, आण्णा उर्फ योगेश सुभाष कोळी, देविदास शंकर कोळी सर्व
रा. अक्कडसे, रावसाहेब कोळी याचे मेहुणे नाव माहित नाही रा. झोतवाडे ह.मु. अक्कडसे, प्रकाश भिमराव कोळी रा. महावीर कॉलनी शिंदखेडा, जयेश रा.नेवाडे व इतर ५ अनोळखी व्यक्ती अशा १५ जणांनी काल (दि. १३) सकाळी ९ वाजेच्या सुमारास अॅड. कोळी यांच्या घरात येवून वाळु वाहतुकीबद्दल तक्रारी करतात व फोटो काढतात असे विचारुन गुप्ती, लोखंडी रॉड व लाठ्या काठ्यांनी हल्ला चढवला. त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील गुप्तीने वार करून जखमी केले. त्यांच्यासह देविदास सोनवणे यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. घरातील सामान अस्तावस्त फेकुन नुकसान केले.यावरुन वरील १५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक सुनिल भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन गोटे करीत आहेत.