लोक न्यूज-
अमळनेर- येथील पिंपळे रोड लगत शांती नगर हि भिल्ल वस्ती आहे. सुमारे ७० घर कुटुंब असून यात ३५० स्त्री पुरुष व लहान मुलं मुली सह राहतात. सर्व नागरिक मोलमजुरी करणारे भूमिहीन अनुसूचित जमातीचे आहेत. सदरची वस्ती २० वर्षा पासून आहे. शांतीनगर भिल्ल वस्तीत आरोग्य, शिक्षण, स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करा अशी मागणी नागरी हित दक्षता समितीने मा अभिजित राऊत जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे केली असून मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी लोक संघर्ष मोर्च्याच्या राष्ट्रीय नेत्या मा प्रतिभा ताई शिंदे, दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा अशोक पवार, सरचिटणीस बन्सीलाल भागवत उपस्थित होते. या प्रसंगी मा जिल्हाधिकारी यांचेशी सदर प्रश्नी सविस्तर तथा गंभीर चर्चा झाली.
शांतीनगर भिल्ल वस्तीत स्वच्छता गृह व रस्ते विकास,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याबाबत नगरपरिषद व पंचायत समिती यांना निवेदन देण्यात आले होते परंतु दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांनी सदर वस्ती आमच्या हद्दीच्या बाहेर आहे असे लेखी लिहून दिले. भिल्ल वस्तीच्या पुढे असलेल्या सार्वजनिक बांधकाम, पोलीस स्टेशन, पोलीस वसाहतीला नगर परिषदेच्या हद्दी बाहेर असूनही सर्व सुविधा आहेत परंतु गरिबांच्या वस्तीला सुविधा नाही या भूमिकेचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.एका महिन्यात शांतीनगर मध्ये रस्ते पाणी स्वच्छता गृह उपलब्ध न झाल्यास
नागरी हित दक्षता समिती अमळनेर शांततेच्या मार्गाने आंदोलन करेल असा इशारा समितीने दिला आहे.