अमळनेरात एलसीबी व स्थानिक पोलिसांनी केली कारवाई, ३ लाख १८ हजारांचा ऐवज जप्त....


अमळनेर (रिपोर्ट)
अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील विजय अमृत पाटील व शिवाजी पाटील हे बनावट दारू व बनावट दूध तयार करण्याचा गोरख धंदा करीत होते.  जळगाव जिल्हा कारागृहातून पसार झालेल्या आरोपींच्या शोधात फिरत असलेल्या एलसीबी पोलिसांना सकाळी सडावन गावाजवळ शिवाजी पाटील व विजय अमृत पाटील हे मोटरसायकल वर चार खोके घेऊन जाताना दिसले. त्यांना शंका येताच त्यांनी त्याला हटकले. तेव्हा त्याच्यात दारू आढळून आली. ही दारू नकली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठांना घटना कळवण्यात आली. एलसीबी पोलीस निरीक्षक बी.जे.रोहम, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे , रामचंद्र बोरसे , नारायण पाटील , मनोज दुसाने , दीपक शिंदे , परेश महाजन , दीपक पाटील , दीपक विसावे , भटूसिंग तोमर , हितेश चिंचोरे,शरद पाटील , रवी पाटील , दीपक माळी , आदींनी लोंढवे येथे तसेच अमळनेर येथील ढेकू रोडवर योगेश्वरनगरमध्ये छापा टाकला असता अमळनेरला २५ बॉक्स दारूचे,खाली बाटल्यांची पोते, स्पिरिट, कलर फ्लेवर, इसेन्स आदी साहित्य तसेच बनावट दूध बनवण्याचे यंत्र , सोयाबीन तेलाच्या पिशव्या , फ्रिज , दुधाचे कॅन , प्लास्टिक ड्रम , असे तीन वाहने भरून साहित्य विजय च्या घरातून जप्त  करण्यात आले.

विजय पाटील तिसऱ्यांदा बनावट दूध बनवताना अडकला पोलिसांच्या जाळ्यात

   दरम्यान, विजय पाटील हा तिसऱ्यांदा बनावट दूध बनवताना आढळून आला आहे. अनेक वर्षांपासून तो बनावट दूध विक्री करून लोकांच्या जीवाशी खेळत होता. त्यात भर म्हणून की काय बनावट दारू देखील तो तयार करू लागला होता. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या रस्त्यावर असलेल्या ढेकू रोडवरच त्याचे उद्योग सुरू होते. कारागृहातून  फरार आरोपींच्या शोधात असताना दोन दिवसात पोलिसांना दोन मोठे अवैध व्यवसायाचे साठे आढळून आले आहेत. गुटखा , दारू , दूध यातील आरोपी हे अमळनेरचे आहेत

दोघा आरोपींकडून असा जप्त केला ऐवज

आरोपी विजय व शिवाजी यांच्या ताब्यातून  ६४ हजार ८०० रुपयांच्या मॅकडॉल व्हिस्की ९ पेट्या , १ लाख १४ हजार २४० रुपयांच्या आयबीच्या २७ पेट्या ,८५ हजार रुपयांच्या २ मोटारसायकली , १५ हजार रुपयांचे लिक्विड रसायन , १० हजार ५०० रुपयांचे ३ ड्रम स्पिरिट , ६ हजार रुपयांचे दुधाचे कॅन , इतर मुद्देमाल ७३०० तसेच दूध बनवण्याचे मशीन १५ हजार रुपये असे एकूण ३ लाख १८ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे.