भुसावळ (रिपोर्ट )-
कोरोनाने अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन कौशल्याचे तंत्रच बदलून टाकले आहे. अर्थात ऑनलाईन शिक्षणाचे माध्यम वापरणे गरजेचे बनल्याने शाळाच घरात आली आहे. पण या घरात आलेल्या शाळेला समृद्ध करण्यासाठी ऑनलाईन साक्षरतेचे मोठे आव्हान शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले आहे, असे मत बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.
भुसावळ येथील जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचे मातोश्री स्व. द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तीनदिवसीय व्याख्यानमालेत डॉ. पाटील यांनी प्रथम पुष्प गुंफले. प्रारंभी जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मातोश्री स्व. द्वारकाबाई नेमाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समन्वयक अरूण मांडाळकर यांनी व्याख्यानमालेचा आढावा घेऊन वक्त्यांचा परिचय करून दिला. उमेश नेमाडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश कथन केला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सल्लागार गणेश फेगडे यांनी केले. त्यानंतर शाळा आली घरात या विषयावर डॉ. जगदीश पाटील यांनी कस्टम ॲनिमेशन पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून झूम अॅपच्या माध्यमातून आपल्या व्याख्यानाची मांडणी केली. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा कधी सुरू होतील हे काही सांगता येत नाही. मात्र या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सध्या तरी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उभा करण्यात आला आहे. त्यामुळे घराघरातील पालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या तरी आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकावे लागणार आहे. अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास करून कृती मालिकांची निर्मिती करावी लागेल. तरच घरात आलेली शाळा समृद्ध होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. ऑनलाईन शिक्षण चार प्रकारे घेता येते. त्यात शंभर टक्के ऑनलाईन, अंशत: ऑनलाईन, व्हिडिओ व ऑडिओ या प्रकारांचा समावेश करता येईल. क्षमतांचा कस लावणारे हे शिक्षण आहे. पण मोठ्या भावाच्या अभ्यासाचे आकलन लहान भाऊही दृकश्राव्य माध्यमांद्वारे करू शकतो. याचा अर्थ ज्ञानाचे भांडार ऑनलाईन शिक्षणाने खुले केले आहे. पालकांनीही ऑनलाईन साक्षरतेवर भर द्यावा, असेही डॉ. पाटील म्हणाले. संगणक, मोबाईल क्रांतीमुळे शिक्षण मुठीत आले आहे. एका क्लिकवर हवे ते मिळवता येते. मात्र असे असले तरी शिक्षण विभागाने पाल्यांना जी पाठ्यक्रमाची पुस्तके पोहोचवली आहेत, ती हाताळावी. मुलांशी संवाद, गप्पा, चर्चांच्या माध्यमातून प्रवाही संवाद साधावा. ऑनलाईन शिक्षणाने शाळा व शिक्षकांचे महत्त्व अजिबात कमी होणार नाही. परंतु आपल्याला या आभासी जगाशी सुद्धा जुळवून घ्यावे लागेल, असेही मत डॉ. जगदीश पाटील यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. गिरीश कोळी, प्रा. निलेश गुरूचल, जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज पांडे, उपाध्यक्ष राहुल भावसेकर, सचिव तुषार झांबरे व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.