लोक न्यूज

अमळनेर तीव्र पूरप्रवण आणि पूर्णतः बाधित होणारे बोहरे गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण अंतर्गत अंशतः बाधित दाखवले असून हा अन्याय तातडीने दूर करून गावाचे पुनर्वसन करणेबाबत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा गावकरी १५ ऑगस्ट रोजी तापी बोरी संगमावर जलसमाधी घेतील असा इशारा बोहरे येथील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाद्वारे प्रशासनाला दिला. तर या आंदोलनाला पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने सक्रीय सहभाग घेत पाठिंबा दिला आहे.
              बोहरे येथील ग्रामस्थांनी अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात केली हातात पुनर्वसण्याच्या मागण्यांचे फलक घेऊन शेकडो महिला पुरुष गावकरी प्रबुद्ध कॉलनी, कोर्ट रोड, विश्रामगृह मार्गे, प्रांताधिकारी कार्यालयावर घोषणा देत आले. याप्रसंगी सदर मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात पोलिसांकडून अडवण्यात आला.
           नायब तहसीलदार अजय कुलकर्णी यांना निवेदन देतांना मोर्चातील  गावकऱ्यांचेवतीने सेवानिवृत्त अधिकारी शिवाजी रुपचंद बागुल, सामाजिक कार्यकर्ते सुनिल अहिरराव, सरपंच सुधीर विश्वास पाटील, प्रभाकर शेषराव विंचुरकर, निखिल धनगर,जयेश बागुल, दिपक धनगर,दगडू पाटील, रविंद्र मालचे,कैलास रोकडे यांचेसह पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, रामराव पवार,अर्बन बॅक चेअरमन पंकज मुंदडे यांनी चर्चा करीत गावच्या पूर्णतः पुनर्वसनाबाबतची कार्यवाही व अहवाल तातडीने तयार करून आवश्यक ती कारवाई  न केल्यास १५ ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्यदिनी बोहरे  येथील सर्व ग्रामस्थ  तापी,बोरी नदीच्या संगमावर जलसमाधी घेऊ याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची  राहील. असा इशारा गावकऱ्यांतर्फे याप्रसंगी  दिला.
                 सदर मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाहून आ. अनिल पाटील यांच्या घराकडे वळला याप्रसंगी माजी जि.प. सदस्या सौ.जयश्री पाटील यांनी सन्मानाने मोर्चेकरांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.तदनंतर मोर्चाकरांनी निम्न तापी प्रकल्प कार्यालयात धडक दिली व संबंधितांना या संदर्भातले निवेदन दिले.
            याप्रसंगी संबंधितांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात, पाडळसरे धरण प्रकल्पामुळे तापी-बोरी-अनेर त्रिवेणीसंगमावर वसलेले बोहरा गावास दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा वेढा पडतो.तरी सदर गाव "अंशतः बाधित" म्हणून दाखवले हा सरळ अन्याय आहे.बोहरा गाव तीव्र पूरप्रवण आणि पूर्णतः बाधित होणारे क्षेत्र आहे, यापूर्वी २००५-०६ मध्ये या पूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला होता. मात्र आजतागायत गावचे पुनर्वसन झालेले नाही.पाडळसरे, धुपे, सात्री, डांगरी अशा अनेक गावांचे पुनर्वसन व नुकसानभरपाई देणेसंदर्भात कार्यवाही झlली, प्रशासनाने गावाच्या पुनर्वसनाकडे साफ दुर्लक्ष केले आहे.गावकरी २०१९ पासून लेखी निवेदन दिले, पत्रव्यवहार करूनही आजूबाजूची गावे "पूर्णतः बाधित" गावाच्या यादीत घोषित झाली, परंतु बोहरा गावास वगळण्यात आले. २६ मार्च २०२५ रोजी, मा. जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी गाव भेट देऊन पाणी प्रवाह तपासणी (high flud) करणे, गावातील घरांचे संरचनात्मक लेखापरीक्षण, माती परीक्षण व सरंचनात्मक ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या.तीन महिने उलटले तरी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.असे म्हटले आहे.