येथील खा.शि. मंडळाच्या जी.एस. हायस्कूल, डी.आर.कन्याशाळा व प्रताप हायस्कूलमध्ये इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू होते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा उशिरा उघडतील . त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, घरच्या घरी विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्थेत या प्रणालीची प्रथमच अंमलबजावणी होत आहे. ही संकल्पना संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडे यांची आहे.
ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यासाठी १०वी ला इंग्रजी, शास्त्र व गणित शिकविणाऱ्या तिन्ही शाळांतील शिक्षकांची रोटरी हॉल येथे बैठक घेण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष मुंदडे,कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, संचालक डॉ.संदेश गुजराथी , जितेंद्र जैन यांनी मार्गदर्शन केले. ऑनलाईन प्रणालीत संचालक मंडळाला काय अपेक्षित आहे व त्यासाठी शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांच्या समन्वयाने काय करावयाचे आहे याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी डिगंबर महाले,मुख्याध्यापक आर.पी.मोराणकर , जे.के.सोनवणे उपस्थित होते.