लोक न्यूज
अमळनेर : स्वर्गीय सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यालयात गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. गोकुळ पाटील हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाला सुरेख सुरुवात केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरुंचे जीवनातील स्थान, त्यांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांबद्दलचा आदर व प्रेम व्यक्त केले.
यानंतर विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती स्वाती पाटील यांनी गुरु-शिष्य परंपरा, गुरुकुल पद्धती तसेच गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर सविस्तरपणे मांडले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना गुरुंचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान अधिक प्रभावीपणे समजले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कीर्ती सोनार यांनी केले, तर प्रास्ताविक श्रीमती वंदना पाटील यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. राहुल पाटील यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
यावेळी श्री. प्रदीप चौधरी, श्री. गोकुळ बोरसे, श्री. सागर महाजन, सौ. रुपाली महाजन यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.