लोक न्यूज
अमळनेर, दि. 28 जुलै : अमळनेर पोलिसांनी अवैध गौणखनिज (वाळू) चोरी व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सहा ट्रॅक्टर ट्रॉलींसह जप्त केले असून सहा चालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांनी अवैध गौणखनिज चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील तेली, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, मयुर पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक प्रमोद बागडे, पोलीस कॉन्स्टेबल हितेश बेहरे व गणेश पाटील यांनी 28 जुलै रोजी पहाटे 1 ते 5 वाजेदरम्यान अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत कारवाई केली.
या दरम्यान हिंगोणे गावाजवळील बोरी नदीपात्रात विनापास व विनापरवाना अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पाच विना क्रमांक प्लेटचे ट्रॅक्टर-ट्रॉली आणि MH-19-CJ-0775 क्रमांकाचा एक ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण सहा ट्रॅक्टर ताब्यात घेतला.
या कारवाईत योगेश नामदेव भोई (वय 25, रा. रुबजीनगर, अमळनेर), प्रविण सुधाकर सोनवणे (वय 36, रा. हिंगोणे खुर्द), राहुल छोटू ठाकरे (वय 20, रा. रुबजीनगर, अमळनेर), अर्जुन अशोक मालचे (वय 25, रा. हिंगोणे खुर्द), सतीष मोहन बावीस्कर (वय 32, रा. हिंगोणे खुर्द) आणि सोमनाथ मधुकर मोरे (वय 20, रा. रुबजीनगर, अमळनेर) या सहा चालकांना ताब्यात घेण्यात आले.
जप्त केलेले ट्रॅक्टर अमळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून संबंधित चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या वाहनांच्या मूळ मालकांचा शोधही पोलीस घेत आहेत.
यापुढे अमळनेर तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन, चोरी व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिला आहे.