अमळनेर | लोक न्यूज | २७ जुलै २०२६
अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती श्याम जयवंतराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. याबाबतचे राजीनामापत्र त्यांनी भाजपचे जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांच्याकडे सादर केले आहे.
आपल्या राजीनामापत्रात श्याम पाटील यांनी नमूद केले आहे की, केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून तालुका स्तरावर विधायक सामाजिक कार्य करण्याच्या सकारात्मक उद्देशाने ते पक्षात कार्यरत होते. मात्र, दिल्लीतील जंतर-मंतर व संसद भवन परिसरात आपल्या भवितव्य, शिक्षण आणि अस्तित्वाच्या प्रश्नांसाठी शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व तरुणांवर करण्यात आलेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिसी कारवाईमुळे ते अत्यंत व्यथित झाले आहेत.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असून, आंदोलकांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. देशाच्या भवितव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणांचा आवाज ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याने आपल्या वैचारिक भूमिका आणि पक्षाच्या सध्याच्या भूमिकेमध्ये मूलभूत मतभेद निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी, वैचारिक प्रामाणिकता आणि सद्सद्विवेकबुद्धीच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत असल्याची घोषणा श्याम जयवंतराव पाटील यांनी केली आहे.
या राजीनाम्यामुळे अमळनेरच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात या निर्णयाचे स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.