लोक न्यूज
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जितेंद्र भास्कर पाटील यांची ८ विरुद्ध ५ मतांनी निवड झाली. माजी उपसरपंच श्रुती श्रीकांत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत जितेंद्र पाटील यांनी बहुमत मिळवत उपसरपंचपदावर आपली निवड निश्चित केली.
निवडणूक प्रक्रियेत लोकनियुक्त सरपंच समाधान पारधी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. एस. कठळे तसेच ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
यावेळी माजी उपसरपंच श्रुती श्रीकांत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मुकेश रायभान पाटील, कावेरी निरंक पाटील, अनिल प्रकाश पाटील, छाया विजय पाटील, सुनंदा प्रभाकर पाटील, सुरेखा किशोर पाटील, दिनेश रतीलाल पाटील, रोशनी भटू पाटील, मिनाबाई रोहिदास घोलप आणि दीपक भगवान पाटील उपस्थित होते.
उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर जितेंद्र भास्कर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. शरद साहेबराव पाटील, अमोल पाटील, किशोर पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी उपसरपंच झाल्याचा अभिमान व्यक्त करत विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
ग्रामपंचायतीच्या नव्या नेतृत्वाकडून गावाच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून जितेंद्र पाटील यांच्या निवडीमुळे गावाच्या राजकीय वर्तुळात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.