लोक न्यूज

जळगाव, दि. ११ जुलै २०२६ :
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या 'मुद्देमाल सुपूर्द मोहीम' अंतर्गत आज (दि. ११ जुलै) पद्मालय हॉल, जळगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांच्या उपस्थितीत अमळनेर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांकडील जप्त मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रियेनंतर मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला.
अमळनेर पोलीस स्टेशन
अमळनेर पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमधील सुमारे ७० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ₹१०,४६,४१५), रोख रक्कम ₹७,०३,०००, तसेच ₹३,१८,००० किमतीचे २६ मोबाईल फोन असा एकूण ₹२०,६७,४१५ किमतीचा मुद्देमाल संबंधित मालकांना परत देण्यात आला.
पारोळा पोलीस स्टेशन
पारोळा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील मारुतीच्या मूर्तीचा ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट (₹५०,०००), १५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मासळ्या (₹१५,०००) तसेच ₹३,५९,००० किमतीचे १४ मोबाईल फोन असा एकूण ₹४,२४,००० किमतीचा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.
एरंडोल पोलीस स्टेशन
एरंडोल पोलीस ठाण्याकडील विविध गुन्ह्यांमधील स्वराज ७४४ XT ट्रॅक्टर (₹१.२५ लाख), न्यू हॉलंड ३२३० ट्रॅक्टर (₹२ लाख), सोनालिका छत्रपती मॉडेल ट्रॅक्टर (₹५.५० लाख) तसेच ₹२२ हजार किमतीचे ३ मोबाईल फोन असा एकूण ₹८,९७,००० किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.
मारवड पोलीस स्टेशन
मारवड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली हिरो कंपनीची मोटारसायकल (क्रमांक MH-19 ER-2263) किंमत ₹२०,००० संबंधित मालकाच्या ताब्यात देण्यात आली.
एकूण ३४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल परत
अमळनेर उपविभागांतर्गत सोने-चांदीचे दागिने, ट्रॅक्टर, मोटारसायकल, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ₹३४,०८,४१५ किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. या मोहिमेमुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
उत्कृष्ट कामगिरीचा गौरव
यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच पोलीस पाटील यांचा गौरव करण्यात आला. अमळनेर उपविभागातील मंगरुळ (ता. अमळनेर) येथील पोलीस पाटील भागवत बापू पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२६ मध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अमळनेर उपविभाग यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, नागरिकांना त्यांचा मुद्देमाल जलदगतीने परत मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला हा उपक्रम विशेष ठरला.