लोक न्यूज
अमळनेर : सध्याच्या धावपळीच्या काळात प्रत्येक जण तणावग्रस्त जीवन जगत आहे. त्यात आहारात विविध फास्टफूडचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने निरोगी जीवन जगणे असह्य बनले आहे. त्यामुळे तणावमुक्तीसाठी सकारात्मक विचार ठेवून सात्त्विक आहार घेणे अतिशय गरजेचे बनले आहे. तरच आपल्याला निरोगी जीवनशैली अंगीकारता येईल, असा सल्ला जळगाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतकुमार भदाणे यांनी दिला.
येथील श्री मंगळग्रह मंदिरात शनिवार, दि. 18 जुलै रोजी आयोजित एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक श्री. भदाणे यांनी तणाव व्यवस्थापन, निरोगी जीवनशैली आणि मानसिक आरोग्य या विषयाचा उपस्थितांसमोर विविध उदाहरणांद्वारे उलगडा केला. तसेच श्री मंगळग्रह मंदिराचे धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व तसेच मंदिरामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहितीही दिली. 
मंगळग्रह संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी मनोगतात अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणारे विविध समाजोपयोगी उपक्रम तसेच श्री मंगळग्रह मंदिरातील पूजाविधींबद्दल मार्गदर्शन केले.
अमळनेरच्या सीडीपीओ सौ. हेमलताताई पाटील, पर्यवेक्षिका सौ. सुजाताताई चौधरी, सौ. भाग्यश्रीताई पाटील, श्रीमती प्रीतीताई देवरे तसेच त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचा श्री. भदाणे यांच्या हस्ते याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सौ. वर्षा भदाणे यांच्यासह पाचोऱ्याच्या ‌‘सीडीपीओ‌’ संत मॅडम यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सीडीपीओ, पर्यवेक्षिका व महिला व बालविकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. एस. सोनवणे, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नंदू कुलकर्णी आदी उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सौ. देवरे यांनी आभार मानले.


अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात शनिवार, दि. 18 जुलै रोजी आयोजित एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जळगाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतकुमार भदाणे. व्यासपीठावर अमळनेरच्या सीडीपीओ सौ. हेमलताताई पाटील, पर्यवेक्षिका सौ. सुजाताताई चौधरी, श्रीमती प्रीतीताई देवरे, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी व्ही. व्ही. कुलकर्णी.