जळगाव | लोक न्यूज | दि. २८ जुलै २०२६
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी २७ जुलै २०२६ रोजी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत २१ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून ₹88 लाख 6 हजार 500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान ७ डंपर, ७ ट्रॅक्टर आणि १९.५० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. एमआयडीसी, यावल, मुक्ताईनगर, सावदा, बोदवड, भडगाव आणि अमळनेर परिसरात ही कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून डंपर आणि वाळू जप्त करण्यात आली. यावल पोलीस ठाण्यातही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. मुक्ताईनगर येथे डंपरसह दोन ब्रास वाळू जप्त करण्यात आली, तर सावदा येथे डंपर व वाळू जप्त करून आरोपींवर कारवाई करण्यात आली.
बोदवड पोलीस ठाण्यात कलम १३२ व ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून अशोक लेलँड कंपनीचा डंपर जप्त करण्यात आला. भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये टाटा कंपनीचे टिप्पर व वाळू जप्त करण्यात आली. अमळनेर येथे अद्याप गुन्हा दाखल नसला तरी ६ ट्रॅक्टर आणि ७.५० ब्रास वाळू ताब्यात घेण्यात आली आहे.
या विशेष मोहिमेत एसडीपीओ गणापुरे, एसडीपीओ मुक्ताईनगर, संबंधित पोलीस निरीक्षक, तहसीलदार बोदवड तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
भुसावळ, चाळीसगाव (एक भाग), पाचोरा आणि चोपडा उपविभागांत या दिवशी कोणतीही कारवाई नोंदविण्यात आलेली नाही.
कारवाईचा एकूण आढावा
एकूण गुन्हे दाखल : ७
प्रलंबित गुन्हे : २
एकूण आरोपी : २१
जप्त वाहने : ७ डंपर, ७ ट्रॅक्टर
जप्त वाळू : १९.५० ब्रास
एकूण जप्त मुद्देमाल : ₹88,06,500