लोक न्यूज
अमळनेर:-तुमच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले,तुमची प्रॉपर्टी विकायला निघालीय,ते कर्ज फेडण्यासाठीच अमळनेरकरांनी पालिका तुमच्या ताब्यात दिली काय?असा सवाल आमदार अनिल पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांना करत आम्ही मंजूर केलेली व पूर्णत्वास येत असलेली विकासकामे केवळ कमिशनसाठी थांबविली जात असल्याचा आरोप केला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार पाटील यांनी म्हटले आहे की अमळनेर येथील स्मशानभूमीतील आवश्यकता लक्षात घेता मी नवीन दहन शेड मंजूर करून त्याचे कामही ठेकेदाराने वेगाने सुरू केले मात्र माजी आमदारांची सत्ता पालिकेत आल्यानंतर त्यांनी ठेकेदारास बिल अदा न केल्याने अंतिम टप्प्यात त्याचे काम थांबविले आहे,त्यामुळे अंत्यविधी बाहेर जमिनीवर होऊन प्रेतांची विटंबना होत आहे.यांनी केवळ कमिशनसाठी काम थांबविणे म्हणजे मेलेल्या टाळूवरील लोणी खाण्याचाच हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.एकतर एकही विकास काम तुम्ही आतापर्यंत आणू शकले नाहीत आणि अनिल भाईदास पाटील यांनी पालिकेच्या माध्यमातून काम आणले असेल तर ते कमिशनसाठी होऊ द्यायचे नाही.मोठ्या अथक प्रयत्नांनी मी 24 बाय 7 नवीन पाणीपुरवठा योजना मंजुर करून आणली तिचे कामही सुरू केले ते काम देखील कमीशनसाठी यांनी बंद पाडले आहे. शहरात आवश्यक त्या ठिकाणी नवीन रस्ते मी मंजूर केले असता तेथील कामे देखील यांनी कमिशनसाठी थांबवून ठेवली आहेत.
पालिका आपल्या ताब्यात आहे त्यामुळे मर्जी असेल त्याच ठेकेदाराची बिले काढू, अमळनेरकरांच्या जीवावर मोठे कमिशन पदरात पाडून घेऊ आणि त्यातून आपले डोक्यावरील कर्ज फेडू असे मनसुबे माजी आमदारांचे असतील तर त्यांनी कोणत्याही भ्रमात राहू नये.यासंदर्भात विधानसभेत मी आवाज उठविणार असून विकासकामांची व नप फंडातील अत्यावश्यक सेवा पाणी पुरवठा रोजंदारी कर्मचाऱ्यांची बिले का काढली जात नाहीत याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असून ती थांबविलेली विकास कामेही लवकरच पुन्हा सुरू होतील असा विश्वास आमदारांनी व्यक्त करत केवळ स्वार्थासाठी आणि कमिशनसाठी विकास कामे थांबविण्याचे उद्योग बंद करून जनतेचे हाल त्वरित थांबवा असे आवाहन केले आहे.
माणसाच्या मृत्यूतही मांडताय कमाईचे गणित
अंत्यविधीसाठी नगरपालिका मार्फत लाकडाएवजी मोफत गौरी पुरविण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याचे समजले आहे.खरे पाहता यापूर्वीही नगरपालिकेकडून अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकडांचे सरण मोफतच दिले जात होते. त्या सरणाची अंदाजे किंमत फक्त ३०० ते ५०० रुपये इतकी होती आणि त्यामध्ये साधारण ७ मन लाकूड मिळत होते,
मात्र आता त्याच सरणासाठी ५,००० रुपयांचा ठराव करण्यात आल्याची चर्चा असून केवळ लाकडाएवजी गौरी पुरविली जाणार आहे.
परंतु “३००–५०० रुपयांच्या सरणाचा खर्च थेट ५,००० कसा?”ही जनतेच्या कराच्या पैशांची लूट नाही का? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. गरीब कुटुंबासाठी अंत्यसंस्कार करणे हेच मोठे ओझे असते. अशा वेळी नगरपालिकेने मदत करणे अपेक्षित असताना अचानक वाढवलेला खर्च हा नेमका कोणाच्या फायद्यासाठी? या निर्णयामागे मोठा आर्थिक घोटाळा किंवा भ्रष्टाचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.गौरीद्वारे खाजगीतही अंत्यसंस्कार करायचे म्हटले तर अडीच तीन हजारांच्या वर पैसे लागत नाहीत.आणि हे त्यापेक्षा कमी तर सोडाच तब्बल 5 हजारांचा ठराव करीत असतील तर ते दुर्देवच आहे. म्हणजेच “माणसाच्या मृत्यूतही जर कमाईचे गणित मांडले जात असेल, तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी?” याचा खुलासा माजी आमदारांनी जरूर करावा असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.