लोक न्यूज
वैजापूर, ता. १५ : Pulwama attack मध्ये शहीद झालेल्या ४० जवानांच्या ७ व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त वैजापूर येथे शनिवारी (ता.१४) भावपूर्ण अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ऑल इंडिया पॅरामिलिटरी फोर्सेस एक्स सर्व्हिसमेन वेलफेअर असोसिएशन, वैजापूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास राज्यातील विविध भागांतील सेवानिवृत्त फौजी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर पत्नी, वीर पिता, वीर माता, सामाजिक कार्यकर्ते तसेच सेंट मोनिका इंग्लिश स्कूलचे एनसीसी विद्यार्थी व करुणा निकेतन शाळेचे स्काऊट विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात Dr. Babasaheb Ambedkar यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान Chhatrapati Shivaji Maharaj, Mahatma Jyotiba Phule, Ahilya Devi Holkar व Maharana Pratap यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.
यानंतर पंचायत समिती प्रांगणात मुख्य कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला वीर पत्नी, वीर माता-पिता, सेवानिवृत्त सैनिक व समाजकार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक गौतम गायकवाड व अशोक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ठा. धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. त्यांनी सेवानिवृत्त सैनिकांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची तसेच शहीद स्मारक उभारण्याची मागणी केली.
यावेळी उपस्थित आमदार रमेश बोरनारे यांनी शहीद स्मारकासाठी पन्नास लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्याची घोषणा केली. तसेच नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी हुतात्मा स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमात गौतम गायकवाड, अशोक पाटील, जवाहर कोठारी, दत्तात्रय सोनवणे, कादरी आदींनी मनोगत व्यक्त केले.
आयोजक गौतम गायकवाड यांच्या हस्ते वीर पत्नींना सन्मानचिन्ह, साडी-चोळी व तिरंगा पट्टी देऊन गौरविण्यात आले. समाजकार्यकर्त्या सितामावशी गायकवाड व धोंडीरामसिंह राजपूत यांनाही स्मृतिचिन्ह, शाल व तिरंगा पट्टी देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक साबेरखान, प्रकाश चव्हाण, डॉ. अमोल अन्नदाते, सरपंच दौलत गायकवाड, पुंडलिक गायकवाड तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील सेवानिवृत्त सीआरपीएफ जवान उपस्थित होते. जालना, बुलढाणा, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांतील माजी सैनिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.