लोक न्यूज
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत पडद्यामागून सहकार्य केल्याबद्दल खासदार स्मिताताई वाघ व साहेबराव दादा पाटील यांचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी मानले आभार

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी सर्व सहकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी खासदार स्मिताताई वाघ तसेच साहेबराव दादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पडद्यामागून भरघोस सहकार्य केल्याचे स्पष्टपणे नमूद केले.
शिरीषदादा चौधरी म्हणाले की, “अमळनेर नगरपरिषद निवडणूक ही केवळ राजकीय लढत नव्हती, तर शहराच्या विकासाचा कौल देणारी निवडणूक होती. या निवडणुकीत विविध स्तरांवरून मिळालेल्या सहकार्यामुळेच आम्हाला अपेक्षित यश मिळू शकले. खासदार स्मिताताई वाघ, साहेबराव दादा पाटील तसेच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी थेट समोर न येता, पण प्रभावीपणे मदत केली. त्यांच्या या योगदानाबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारणापलीकडे जाऊन सहकार्याची भूमिका घेतली गेली, ही सकारात्मक बाब आहे. “नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी एकत्रितपणे काम करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषदेत उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना शिरीषदादा चौधरी यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले. “तळागाळातील कार्यकर्त्यांनी तमा न बाळगता केलेल्या परिश्रमांचेच हे फळ आहे,” असे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमळनेर नगरपरिषदेत स्थिर आणि विकासाभिमुख नेतृत्व देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

1 जानेवारी 2026 रोजी जनतेच्या साक्षीने स्वीकारणार पदभार... 


थोडक्यात राजकीय विश्लेषण.....

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत पडद्यामागील सहकार्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी भाजपच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे उघडपणे आभार मानल्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या समन्वयाचे संकेत मिळत आहेत.
विकासाच्या मुद्द्यावर पक्षभेद बाजूला ठेवून सहकार्याची भूमिका घेतली गेली, तर नगरपरिषदेमार्फत अमळनेरच्या विकासाला गती मिळू शकते, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.