लोक न्यूज
अमळनेर तालुक्यात पुन्हा एकदा अनधिकृत मुरूम उत्खननाचा प्रकार समोर आला आहे. हेडावे-सारबेटे शिवारात खाणपट्टा मंजूर नसतानाही मोठ्या प्रमाणावर मुरूम काढण्यात येत असून, दररोज २० ते २५ डंपर मुरूम विविध रस्त्यांच्या कामासाठी वाहून नेला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणामुळे महसूल विभागाचा अनागोंदी कारभार आणि त्यावरील कारवाईचा अभाव पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.
गलवाडेनंतर आता हेडावे-सारबेटे शिवारात उत्खनन
याआधी गलवाडे शिवारात मोठ्या प्रमाणावर मुरूम उत्खनन करण्यात आले होते. त्या ठिकाणावरील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर उत्खनन थांबवण्यात आले, मात्र महसूल विभागाने त्यावेळी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. आता हेडावे-सारबेटे परिसरात पुन्हा जेसीबींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर मुरूम उत्खनन सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे उत्खनन शासनाच्या परवानगीशिवाय सुरू आहे. दररोज अनेक डंपरद्वारे मुरूम बाहेर पाठवला जात असून, महसूल प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे आरोप केले जात आहेत.
ग्रामपंचायतींच्या ठरावाचा गैरवापर
तालुक्यातील काही गावांमध्ये पंचवीस-तीस नागरिकांची सही घेऊन ग्रामपंचायतीकडून रस्त्यांसाठी मुरूम काढण्याचा ठराव मंजूर केला जातो. मात्र, प्रत्यक्षात तो मुरूम रस्त्यांऐवजी खासगी ठिकाणी आणि बांधकामासाठी वापरला जात असल्याचे समजते. हेडावे-सारबेटे शिवारातील उत्खननही अशाच प्रकारचे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पर्यावरणीय हानी व महसूलचे दुर्लक्ष
अनधिकृत मुरूम उत्खननामुळे परिसरातील टेकड्या समतल झाल्या असून, मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय हानी झाली आहे. शासनाच्या नियमांनुसार कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ दंड आकारून वाहने सोडून देण्याची पद्धत सुरू असल्याने, महसूल अधिकाऱ्यांवर ‘दुर्लक्षाचे राजकारण’ केल्याचे आरोप होत आहेत.
"मुरूम माफिया"चा प्रभाव वाढतोय?
महसूल विभाग व लोकप्रतिनिधी यांचे मौन पाहता, तालुक्यात “मुरूम माफिया”चा प्रभाव वाढत असल्याची चर्चा रंगली आहे. काही स्थानिकांचा आरोप आहे की, या प्रकरणात अनेक प्रभावशाली लोकांचे हात असून, अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. भविष्यात हीच मुरूम माफिया व्यवस्था तालुक्याच्या प्रशासनावर वर्चस्व गाजवेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.