लोक न्यूज
येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक आणि संस्कृतीप्रधान पद्धतीने दीपोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात आकर्षक रांगोळ्या, फुलांचे तोरण आणि आकाशकंदीलांनी सजावट करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मीमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या वेळी प्राचार्या सुमित्रा झाँजोटेउपप्राचार्या दीपाली राजपूत, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींनी राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या अयोध्या आगमनाचा सुंदर देखावा सादर केला. या सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांनी ‘राम आयेंगे तो अंगणा सजाऊंगी’ हे भावस्पर्शी गीत सादर करून कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर विद्यार्थिनींनी ‘दीपावली मनाये सुहानी’ या गीतावर रंगतदार नृत्य सादर केले. नृत्यादरम्यान विद्यार्थ्यांनी तयार केलेले साईबाबांचे प्रतिरूप विशेष आकर्षण ठरले.
प्राचार्या सुमित्रा झाँजोटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील प्रकाशाचा आणि ऐक्याचा सण आहे. या सणातून आपण समाजात आनंद आणि सद्भावना पसरवाव्यात,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्वांना सुरक्षित आणि आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
उपप्राचार्या दीपाली राजपूत यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प घेण्याचे आवाहन केले. शाळा प्रशासन समितीने सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिष्टान्न बॅग्स भेटस्वरूप वाटप केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सुमधुर संगीताच्या तालावर मनसोक्त नृत्य करत दिवाळीचा उत्सव साजरा केला. शाळेच्या इमारतीला रोषणाई, फुलझड्या व फटाक्यांनी सजविण्यात आले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या दीपोत्सवाचा आनंद मनमुराद लुटला.
शेवटी सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.