लोक न्यूज
अमळनेर : धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे मानवी शरीराला अपायकारक असे भेसळयुक्त दुधाचा कारखाना पकडून एलसीबी पोलिसांनी अभिनंदनीय कामगिरी केली आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन जिल्ह्यात कारवाई करण्यास असमर्थ ठरले आहे. अमळनेर तालुक्यात यापूर्वी दोनदा भेसळयुक्त दुधाचे कारखाने उध्वस्त केल्यानंतरही अजूनही भेसळयुक्त दूध शहरात विकले जात असल्याचे समजते. बालकांच्या जीवाशी खेळ केला जातोय.
     स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या  पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना भवरखेडा येथील सोमनाथ आनंदा माळी हा भेसळयुक्त दूध तयार करून ते विक्री करतो अशी माहिती मिळाली होती. त्यांनी अन्न व औषध प्रशासनचे किशोर आत्माराम साळुंखे याना तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक सुनील पवार , पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे ,पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार , हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे , दीपक माळी , रवींद्र पाटील , विलेश सोनवणे , बाबासाहेब पाटील , वर्षा गायकवाड यांनी छापा टाकून त्याठिकाणी ७६ लिटर दुध त्यात एका कॅन मध्ये भेसळयुक्त दूध , १.६ किलोग्राम रिफाईन पाम करनेल खाद्यतेल, साडे चार किलो स्प्रे प्राईड पावडर आढळून आले. सोमनाथ माळी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २७४,२७५ ,१२३,३१८ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६(१), २७(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     _अमळनेरातही होते भेसळ युक्त  दुधाची विक्री_?

अमळनेर तालुक्यात यापूर्वी दोनदा भेसळयुक्त दुधाचे कारखाने उध्वस्त करण्यात आले होते. मात्र पुन्हा भेसळयुक्त दुधाची विक्री सुरू असल्याची  ओरड होत  आहे. सोयाबीन तेल , पामतेल , युरिया , स्प्रे प्राईड पावडर , निळ असे पदार्थ टाकून बालकांच्या जीवाशी खेळ केला जातोय. काहींकडे फक्त दोन म्हशी तरी २५० - ३०० लिटर दुध विकतात ,= काही ठिकाणी म्हशी नाहीत तरी तेथून शेकडो लिटर दुध विक्रीला जाते , अनेक हॉटेल मध्ये कधीच दूध आलेले दिसत नसताना त्याठिकाणी दुधापासून बनवलेली मिठाई तयार होताना दिसते ही बाब अतिशय गंभीर आहे. अन्न व औषध प्रशासन कधीही स्वतःहून कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवनाशी घातक खेळ खेळला जात आहे. जिल्ह्यात सर्वत्र ही कारवाई एकाच वेळी झाली पाहिजे. अचानक प्रत्येक डेअरीवर दुधाचे नमुने घेऊन त्याची तपासणी प्रामाणिकपणे केल्यास निश्चित महाघोटाळा उघडकीस येईल.